Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलगा नाहीं, त्यालाहि मुलेंमुली नाहींत. असत्यावर मुहंमद कसे स्थिर होणार? सत्य असत्याशी तडजोड कशी करील? जें नाहींच तें आहे असें कसें म्हणावें? मुहंमदांनी पुन्हां या पूर्वविधानाचा निषेध केला व म्हणाले, "या देवता नाहींत. हीं तीन पोकळ नांवें आहेत. तुम्ही व तुमच्या पूर्वजांनीं तीं शोधून काढली."
 मुहंमदांच्या मनांत तडजोड करावी असें प्रथम असेलहि कदाचित्, परंतु असा विचार मनांत आला म्हणून का मुहंमद हिणकस ठरतात? ख्रिश्चन चरित्रकार मुहंमदांचा अधःपात, घसरले मुहंमद, घाबरले वगैरे... या गोष्टीसंबंधीं लिहितात. मुहंमद क्षणभर परम सत्यापासून जरा खाली आले तरी ते कां खाली आले? त्यांच्या अनुयायांचे अपार हाल होत होते. मूर्तिपूजेविरुद्ध मुहंमद झगडत होते. यश येत नव्हते. छळ पाहून त्यांचे दयार्द्र मन दुःखी होई. आणि म्हणून करावी थोडी तडजोड, असें आलेंहि असेल त्यांच्या मनांत. परंतु साऱ्या जीवनांत ही पहिली व अखेरीचीच तडजोड! याप्रसंगांनें मुहंमद हिणकस न दिसतां अधिकच उदात्त दिसतात. अनुयायांच्या छळानें क्षणभर कसे खालीं येतात, परंतु पुन्हां धैर्याने उभे राहून, "नाहीं, त्या देवता नाहींत. मला मोह पडला, सैतानानें मला क्षणभर भूल पाडली." असें ते जाहीर करते झाले. सत्यासत्याचा हा केवढा झगडा ! क्षणभर डोकावलेलें असत्य त्यांनी साफ उडवून दिलें. पुन्हां स्वतःला व स्वतःच्या अनुयायांना आगीत घालण्यासाठीं ते उभे राहिले. किती झालें तरी मुहंमद मर्त्य मनुष्यच होते. ते कांहीं ईश्वर नव्हते. ते स्वतःला साधा मर्त्य मानवच म्हणत. मुहंमदांचं जीवन मानवी आहे. आणि त्या छळामुळे क्षणभर झालेली जी ही चलबिचल तिच्याविषयीं पुढें ते कितीदा तरी बोलत. आपल्या प्रवचनांतून सांगत.

  

इस्लामी संस्कृति । ७३