Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माहित नव्हती. तें सर्वांशी प्रेमळपणाने वागत. त्यांच्या प्रेमळ वर्तनाच्या शेंकडों गोष्टी आहेत. त्यांचे कोमल संस्कारी मन त्या गोष्टींतून प्रकट होतं.
 अनस नांवाचा त्यांचा एक नोकर होता. त्याला कोणी बोलले तर त्यांना खपत नसे. तो अनस म्हणाला, "पैगंबरांजवळ मी दहा वर्षे होतो. परंतु रागाचा ऊफ् असा शब्दहि ते कधी मला बोलले नाहींत!" कुटुंबांतील मंडळींजवळहि ते अति प्रेमाने वागत. त्यांचे मुलगे सारे लहानपणीच मेले. त्यांना फार दुःख वाटे. एक मुलगा त्यांच्या मांडीवरच मरण पावला. एका लोहाराची बायको या मुलाला दूध पाजी. तिच्या धुराने भरलेल्या घरांत तें मरणोन्मुख बाळ मांडीवर घेऊन मुहंमद बसले होते. त्या बाळाच्या मरणानें मुहंमद रडले! मदिनेंत स्वतःच्या आईच्या कबरीजवळ मुहंमद रडत. निधनापूर्वी मुहंमद आपल्या बरोबरचे जे साथीदार मित्र मेले त्यांच्या कबरींना एके रात्रीं भेटून आले, तेथे अश्रुसिंचन करते झाले. हृदयाची अशी हळुवारता त्यांच्याजवळ होती. म्हणून 'बायक्या', 'स्त्रीस्वभावाचा' असे त्यांना म्हणत.
 मुलांचं त्यांना फार वेड. रस्त्यांत त्यांना थांबवीत. त्यांना प्रेमाने थापट मारीत, त्यांच्या मुखावरून प्रेमाने हात फिरवीत, त्यांना गोष्टी सांगत. त्यांच्या बरोबर फिरत. जणुं देवदूतांबरोबर फिरणें! पोरक्या मुलांविषयीं तर त्यांना अपार प्रेम वाटे. कारण ते स्वतः त्या मातृपितृविहीन स्थितींतून गेले होते.
 केलेला करार त्यांनीं कधीं मोडला नाहीं. दिलेला शब्द सदैव पाळला. त्यांनी कधीं कोणाला मारलें नाहीं. बोलण्यांत कधीं रागावलेच तर, "झाले तरी काय तुला! तुझें कपाळ चिखलानें भरो!" असे म्हणत. कोणी जर त्यांना म्हणालें, "अमक्याला शाप द्या, त्याचें निःसंतान होवो म्हणा." तर पैगंबर म्हणत, "मी मानवजातीस शाप देण्यासाठीं नाहीं आलों. दया व प्रेम देण्यासाठी देवाने मला पाठविलें आहे." कोणी आजारी असला तर त्याला भेटायला जात, धीर देत. वाटेंत प्रेतयात्रा दिसली की लगेच तींत सामील होत. मग गरिबाची असो की श्रीमंताची. ते समतेचे भोक्ते. त्यांनी एका गुलामाला मुक्त करून त्याचें लग्न एका खानदानी स्त्रीशी करून दिलें होतें. स्त्रियांची, गुलामांची स्थिति त्यांनी किती सुधारली. ते स्वतः सर्वांना स्वतंत्र करीत. उदाहरणानें शिकवीत. ते गरिबीत आनंद मानीत. श्रमाचे ते उपासक होते. ते स्वतः स्वतःचे नोकर होते. स्वतःचे कपडे शिवीत,
१४८ ।