Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इच्छा असे. ज्यू व ख्रिश्चन यांच्याजवळ त्यांनीं पुनःपुन्हां मिळतें घेतलें. विशेषतः ज्यूंजवळ. परंतु या ज्यूंनीं पुनःपुन्हां विश्वासघात केला. नवीन शासनसत्तेचा विश्वासघात केला. म्हणून मुहंमदांस कठोर व्हावें लागलें. कुराणांतील बरेचसे उल्लेख हे विशेषतः ज्यूंना उद्देशून आहेत. त्या त्या विश्वासघातामुळे, सात्त्विक संतापाने ते आलेले आहेत. परंतु मुहंमद क्षमामूर्ति होते. ते स्वतःचा धर्म सक्तीनें लादूं इच्छित नसत. आईबापांनी मुलांवर हि धर्माची सक्ति करूं नये म्हणत. आपण धर्माचा उपदेश करावा. फळ देणें ईश्वराहातीं. तो न्याय देईल. योग्य तें वाढवील. त्याची इच्छा असती तर सारे एका धर्माचे नाहीं का होणार? प्रत्येक देशांत त्याने ईश्वरी पुरुष निर्मिले, अपौरूषेय धर्मग्रंथ दिले. 'माझा धर्म मला, तुझा तुला, कशाला झगडा?' असे म्हणावें. आपलीं मतें शांतपणे बुद्धिपूर्वक मांडावीं. सक्ति नको." असें ते सांगत. पैगंबर सर्वांशी सलोख्याने राहूं इच्छित होते. पत्नी विधर्मी असली, ख्रिस्ती धर्माचीं असली तरी तिचा धर्म तिला पाळू द्यावा, असे त्यांनी सांगितले आहे. ज्यूंचे प्रेम संपादण्यासाठीं ते नमाजाच्या वेळेस प्रथम जेरूसलेमकडे तोंड करीत. परंतु पुढे ज्यूंचे दुष्ट व खुनशी वर्तन पाहिल्यावर पैगंबर आपल्या राष्ट्रीय स्थानाकडे, काबाकडे तोंड करूं लागले. शुक्रवार हा मुख्य दिवस झाला. ज्यूंचे उपवास सोडून नवीन रमजानचे उपवास सुरू झाले. काबाकडे तोंड करणें, काबाची सर्वांनी यात्रा करणें हीहि एक तडजोडच होती. जरी तेथील सर्व देवता भंगण्यांत आल्या, तरी तो एक पवित्र दगड प्रभूची आकाशांतून आलेली ती खूण त्यांनी ठेवली! काबाचें पावित्र्य ठेवलें, यांत कुरेशांजवळ थोडी तडजोड होती. तसेच या करण्यांत मुहंमदांची मुत्सद्देगिरी व दूरदृष्टि दिसते. एका दिशेकडे सर्वांचें तोंड. एक पवित्र स्थान सर्वांच्या समोर सर्व राष्ट्राचे यामुळे त्यांनीं महान् ऐक्य निर्मिलें. जगांतील सर्व मुस्लिमांचें ऐक्य केलें. ती थोर ऐक्यकारक गोष्ट होती.
 मुहंमद केवळ क्षमामूर्ति होते. स्वतःवर अपकार करणाऱ्यावर त्यांनी उपकारच केले. विष पाजणाऱ्यांसहि प्रेम दिलें. मारायला आलेल्यांस प्राणदान व दया शिकविली. आपल्या मुलीचा क्रूर खून करणाऱ्यासहि क्षमा केली. स्टेटच्या गंभीर प्रसंगी ते कठोर होत. परंतु वैयक्तिक जीवनांत कठोरता त्यांना

इस्लामी संस्कृति । १४७