इतर वाईट चाली यांचे निर्मूलन केलें. जो परात्पर प्रभु स्वतःच्या सामर्थ्यानें व प्रेमानें या विश्वाचें नियमन करितो त्या सत्य देवाची जाणीव अरबांना पूर्णपणे आली. मूर्तिपूजेचा संपूर्ण त्याग मुहंमदांनीच करून दाखविला. मुस्लिम धर्मात मूर्तिपूजा कोणत्याहि स्वरूपांत पुन्हां आली नाहीं आणि जी अरब जात केवळ मूर्तिपूजक होती त्यांना संपूर्णपणे केवळ एका ईश्वराला भजणारे मुहंमदांनीं केलें. ही खरोखर अद्भुत व अपूर्व अशी गोष्ट होती.
पैगंबरांची वाणी अत्यन्त प्रभावी होती. ती दैवी संस्फूर्त वाणी वाटे. परमेश्वराचें अद्वितीयत्व इतक्या उत्कटपणें, तीव्रपणं क्वचितच् कोठें उपदेशिलें गेलें असेल उद्घोषिलें गेलें असेल, अरब अतःपर केवळ ऐहिक दृष्टीचे राहिले नाहींत मरणानंतर अधिक उच्चतर, शुद्धतर व दिव्यतर असें जीवन असतें. त्या मरणोत्तर जीवनासाठी या जीवनांत दया, चांगुलपणा, न्याय, सार्वत्रिक प्रेम जीवनांत दाखविली पाहिजेत, असें पैगंबरांनी शिकविलें. हा जो अमूर्त परमेश्वर तो अनाद्यनन्त आहे. तो विश्वाधार आहे. सर्वशक्तिमान्, प्रेमसिंधु व दयासागर आहे. ही जी नवजागृति आली त्याचं मुहंमद स्फूर्तिस्थान होते. ईश्वराच्या आदेशाने या नवचैतन्याचे ते आत्मा होते, प्राण होते ते! जणुं नव प्रेरणेचे अनंत निर्झर होते. या झऱ्यांतून अरबांच्या शाश्वत आशांचे प्रवाह वहात होते. आणि म्हणून मुहंमदांविषयीं अपार भक्तिभाव ते प्रकट करीत.
सर्व अरबांची जणुं आतां एकच इच्छा झाली की, त्या परमेश्वराची सत्यानें व पावित्र्यानें सेवा करावी. प्रभूची आशा व इच्छा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून प्रकट करावी. या वीस वर्षांत पैगंबरांनी जें जें सांगितलें, जीं जीं वचने उच्चारिलीं, जें जें मार्गदर्शन केलें, जीं सत्यें दिलीं, तें सारें अरबांच्या हृदयांत जणुं कोरल्यासारखे झालें होतें. त्यांच्या जीवनाची ती श्रुतिस्मृति झाली होती. कायदा व नीति यांचे ऐक्य झालें. सदसद्विवेकबुद्धीसाठी आनंदानें बलिदानें करणारे दिसूं लागले. त्यागाची पराकाष्ठा करणारे शोभुं लागले. जगाला एवढी मोठी जागृति इतक्या तीव्रपणे व उत्कटपणे क्वचितच कोणी दिली असेल. मुहंमदांनीं आपल्या हयातीत आपलें कार्य पुरें केलें. बुद्धाचें काम अशोकानें पुरे केलें. ख्रिस्ताचें कॉन्स्टंटाईननें, झोरा आस्टरचें उरायसनें, इस्त्राएलांचें जोशुआनें. परंतु मुहंमदच एक असे झाले ज्यांनी स्वतःचे व पूर्वी होऊन गेलेल्यांचेहि कार्य पुरें केलें. जणुं सारे काम ईश्वरच
इस्लामी संस्कृति । १३५