Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुन्हां मूर्तिपूजेकडे वळू नयेत म्हणून सारे जुने अवशेष, खाणाखुणा नष्ट करणें प्राप्त होतें. नवव्या वर्षाच्या यात्रेच्या वेळेस पैगंबरांनी अलीला मक्केत एक शासनपत्र वाचायला सांगितले. मूर्तिपूजेच्या मुळावर घाव घालणारे ते फर्मान होतें. मूर्तिपूजेसंबंधींच्या सर्व आचारांवर व विधींवर तो शेवटचा प्रहार होता. पुढें दिल्याप्रमाणें तें फर्मान होतें :
 "अतःपर कोणत्याहि मूर्तिपूजकास या यात्रेत येतां येणार नाहीं. तसेच काबाभोवती ज्या प्रदक्षिणा घालावयाच्या त्या दिगंबर होऊन घालतां कामा नयेत. पैगंबरांजवळ ज्यांचे ज्यांचे करार आहेत ते त्यांना मुदत संपेपर्यंत बंधनकारक आहेत. जे यात्रेकरू येतील त्यांनी चार महिन्यांच्या आंत आपापल्या प्रान्तीं परत जावें. त्या मुदतीनंतर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पैगंबरांवर नाहीं. अर्थात् ज्यांच्या संरक्षणासंबंधी इतर तह व करारनामे असतील त्यांची गोष्ट निराळी."
 या जाहीरनाम्यास 'जबाबदाराची घोषणा' असें नांव आहे. मूर्तिपूजक व हे नवधर्मी जर यात्रेत मिसळू दिले असते तर मुहंमदांचे कार्य पुढे नष्टहि झाले असतें. त्या परंपरागत रूढींचा पगडा पुन्हां बसला असता. ख्रिस्ती व ज्यू धर्मात शिरलेले प्रकार मुहंमदांनी पाहिले होते. त्या धर्मातून मूर्तिपूजेचीं स्वरूपें शिरली. मारामाऱ्या सुरू झाल्या. कत्तली सुरू झाल्या. रूढींचं साम्राज्य पुन्हां बळावलें. तसें होऊं नये म्हणून पैगंबरांनी वर सांगितलेली दूरदर्शी योजना केली. यात्रेकरू नवीन जाहीरनामा ऐकून गेले व उरलेसुरले मूर्तिपूजकहि लौकरच मुसलमान झाले.
 हिजरीचें दहावें वर्ष आले. या दहाव्या वर्षी यमन व हिजाझ या भागांतील उरलेसुरले मुस्लिम झाले. तसेंच हजरामूत व किन्दा वगैरे ठिकाणच्या जाति- जमातीहि मुसलमान झाल्या. अरबस्थानांतून अनेकांची शिष्टमंडळे येत होती. पुढारी येत होते. आपापली निष्ठा प्रकट करीत होते. मुहंमद सर्वत्र प्रचारक पाठवीत होते. एके दिवशी सकाळची प्रार्थना झाल्यावर मुहंमद म्हणाले, "आतां प्रचार हवा. कोणी इकडे जा, कोणी तिकडे जा. सर्वत्र जा. लांब जा, दूर जा. ख्रिस्ताच्या प्रचारकांप्रमाणे नका होऊ. ते जवळच्या लोकांतच प्रचार करते झाले. तुम्ही दूरहि जा. त्या त्या लोकांच्या भाषा शिका. सर्वां

इस्लामी संस्कृति । १३३