डोकावणाऱ्या त्या मारेकऱ्यांस वाटत होतं. मुहंमदं तेथून निसटले. ते अबुबकरच्या घरीं गेले. आणि दोघे मक्का सोडून रात्री बाहेर पडले. जन्मभूमि सोडून बाहेर पडले. सौर पर्वतावरील गुहेत दोघे कांहीं दिवस लपून राहिले. हा पर्वत मक्केच्या दक्षिणेस आहे. मुहंमद निसटले, हे जेव्हां कुरेशांना कळले तेव्हां त्यांच्या संतापास सीमा राहिली नाहीं. ते चवताळले. पाठलागासाठीं घोडेस्वार दौडले. मुहंमदांच्या डोक्यासाठी शंभर उंटांचे बक्षिस जाहीर करण्यांत आलें! एकदां तर पाठलाग करणारे गुहेच्या अगदी जवळ आले होते.
"ते येणार. आपण सांपडणार. आपण दोघेच." असें अबुबकर घाबरून म्हणाले.
"दोघे कां? आपण तिथे आहांत. तिसरा परमेश्वर आहे." मुहंमद शांत श्रद्धेनें म्हणाले.
त्या गुहेच्या तोंडावर कोळ्याने जाळे विणले होते! पाठलाग करणारे म्हणाले, "या गुहेत नसणारच. गुहेत शिरते तर ते जाळे कसे टिकतें!" आणि ते गेले. प्रभूची जणुं कृपा. त्या गुहेत रोज अबुबकरांची मुलगी गुप्तपणें अन्न आणून देई. कुरेश पाठलाग करून थकले, कंटाळले. तीन दिवसांनी पाठलाग थांबला. तिसऱ्या दिवशी सायंकाळी हे दोघे गुहेतून बाहेर पडले. दोन उंट वाटेंत त्यांनी मिळविले. उंटावर बसून निघाले. रस्तोरस्ती बक्षिसाची लालूच असलेले मारेकरी दौडत होते. एकां तर एक घोडेस्वार पाठीस लागला.
"संपले सारे!" अबुबकर म्हणाले.
"भिऊं नकोस. ईश्वर राखील." मुहंमद म्हणाले.
पाठलाग करणाऱ्याचा घोडा उधळला. घोडेस्वार पडला. तो चकित झाला. तो पैगंबरांजवळ आला व क्षमा मागता झाला. एका हाडाच्या तुकड्यावर क्षमा लिहून अबुबकर यांनी दिली. तो घोडेस्वार गेला. तीन दिवसांच्या प्रवासानंतर दोघे यसरिबच्या दक्षिणेस असलेल्या कुब्बा गांवीं येऊन पोचले. यसरिबच्या मनोऱ्यावरून एक ज्यू पहात होता. त्याला हे दोघे दिसले. कुराणाच्या सहाव्या सुऱ्यामध्ये विसावी कविता आहे. तींत पुढील मजकूर आहे :
"ज्यांना पूर्वी बायबल मिळाले, देवाचें पुस्तक मिळाले ते मुहंमदांस ओळखतात. ज्याप्रमाणे ते स्वतःची मुलेबाळे ओळखतात."
९० ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१०५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे