Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आणि मक्केतील इस्लाम घेतलेली कुटुंबं यसरिबला जाऊं लागली. इ. स. ६२२ मधली ही गोष्ट. दोन महिने अनुयायी जात होते. यसरिब मक्केपासून अडीचशे मैल लांब होतें. दगदगीचा कष्टाचा रस्ता. परंतु धन्य त्यांची निष्ठा. शंभर कुटुंब गेली. मोहल्लेच्या मोहल्ले ओस दिसूं लागले. रबियाचा मुलगा ओतबा म्हणाला, "प्रत्येक सुखी घर आज दुःखी होत आहे. गजबजलेल्या घरांतून आतां केवळ वारे भिरभिर करतील आणि हे सारे आपल्याच भावाच्या मुलामुळे. त्यानें आमच्यांत भेद पाडले, भांडणे निर्मिलीं."
 येशु ख्रिस्त एकदां म्हणाले, "होय मी शांति देण्यासाठीं नाहीं आलों. मी तरवार देण्यासाठी आलो. मुलगा बापाच्या विरुद्ध जाईल. मुलगी आईच्या विरुद्ध जाईल. सून सासूच्या विरुद्ध जाईल."
 पैगंबर असें स्वतः म्हणाले नाहीत. परंतु विरोधकांनी हेंच पैगंबर करीत आहेत असें म्हटलें! नवीन क्रान्तिकारक विचार जेव्हां जेव्हां येतो तेव्हां तेव्हां असाच देखावा दिसतो. नव्या जुन्याची ओढाताण असते.
 आणि सुहैब नांवाचा एक ग्रीक गुलाम होता. तो आतां श्रीमंत झाला होता. नवधर्म घेऊन तोहि यसरिबला जायला निघाला.
 "अरे, तू येथे आलास तेव्हां दीनदरिद्री होतास आणि आतां सारी संपत्ति बरोबर घेऊन निघालास वाटते?" त्याचा पहिला श्रीमंत व्यापारी धनी म्हणाला.
 "मी संपत्ति सोडली तर जाऊं द्याल ना?"
 "जाऊं देऊ."
 आणि सुहैब सारी संपत्ति सोडून, परंतु धर्माची शाश्वत संपत्ति घेऊन निघाला. मुहंमद म्हणाले, "फार फायदेशीर सौदा केला सुहैबनें! ग्रीस देशाची इस्लामला ही पहिली जोड मिळाली."
 मक्केंत केव्हां वादळ सुरू होईल नेम नव्हता. घरांना कुलुपें लागत होतीं. सारे गेले. अलि, अबुबकर व मुहंमद तिघेच आतां राहिले. मुहंमद निसटून जातील, अशी कुरेशांना भीति वाटली. कुरेशांची एक सभा भरली. इतरहि घराण्यांचे व जमातींचे मक्केतील प्रमुख लोक तेथे बोलावण्यांत आले होते.
८८ ।