पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सून नायतर कायम माघारपणाला आलेली गरीब लेक विहिरीत मरतेच. काळुंकेची मथुरा, जगतापाची लेक भामा, वरपेमामांची शांता. किती नावं सांगू? विशी-बाविशीचं तरुण वय. पण जीवनात आनंदच नाही. गेल्या साली गयाकाकीची सून पद्मा मेली. दहा माणसांचं घर. एकली सून. पाणी भरता भरता थकून जाई. एक दिवस गेली ती आली नाही. शोध शोधलं. दुसरे दिवशी फुगून वर आली. घडा वरती पडलेला.
 आमी तुमाले मत दिलंया. तुमी चलावं लागतंय तालुक्याला. तुमी पुढं व्हा. आम्ही मागं येतो."
 केशरबाईने होकार दिला. तारीख ठरली. वार ठरला. येईल तो सोमवार नक्की केला.
 दोन दिवस बायांची भलतीच धांदल. बाई घराबाहेर जायची. मग भाकरी, धपाटे करून ठेवा. चटणी, लोणचे बाहेर काढून ठेवा, सारी तयारी तिनेच करायची. पहाटे शंभर-सव्वाशे बाई वाट चालू लागली. यलडा आले. केशरताई तयारच होती. तिथूनही पाऊणशे बाई निघाली.
 साडेदहा वाजलेले. अहमदपूरचा बाजार.. दोन अडीचशे बाया. दोन-दोनजणी हाती हात घेऊन. ओळीने चालताहेतः पुढे दोघी रिकामी, उलटी घागर डोईवर घेऊन. शहरातील माणसे चकित. जो. . तो बघतोय. मनात