पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१८३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१७३)
केशवराव नारायण.

पुढे एकतर्फी दुतर्फी मोडून करवीरकर व इचलकरंजीकर यांमध्ये आजरें तालुक्याचीं खेडीं वांटलीं गेलीं, तेव्हां हे गांव इचलकरंजीकरांच्या वांटणीत आले. हे गांव आपले आहेत असा सावंतवाडी संस्थानानें वाद सुरू केला. केशवराव तात्यासाहेबांचे म्हणणें कीं, या गांवांच्या उत्पन्नाचा कांहीं अंश मात्र पूर्वीपासून सावंतवाडी संस्थानास मिळत असतो. परंतु गांवांच्या मालकीशीं त्या संस्थानाचा कांही संबंध नसून मालकी आपली आहे. या वादाचा निर्णय स.१८४५।४६ त इंग्रजसरकारानें सावंतवाडीकरांच्या तर्फेनें केला व गांव त्यांस देऊन टाकिले. सांप्रत आंबवली हें साहेबलोकांचें हवा खाण्याचें ठिकाण म्हणून या प्रांतीं प्रसिद्ध आहे.
 स. १८४४।४५ त करवीरहद्दींत बंडाळी माजली होती तिला सामानगडचें बंड म्हणतात. हें बंड मोडण्यासाठीं इंग्रजसरकारास फौज पाठवून बंडवाल्यांशीं लढाई करावी लागली व सामानगडचा किल्ला तोफा लावून यावा लागला. या कामीं इंग्रजसरकारास पंधरा लक्ष रुपये स्वारीखर्च आला. तें कर्ज करवीरसंस्थानाच्या माथी बसलें.सामानगडच्या गडकऱ्यांस आपली 'मिरासदारी' बुडते असें भय पडल्यावरून त्यांनीं दंगा केला आणि त्यावरून इतका अनर्थ झाला! या प्रसंगी केशवराव तात्यासाहेबानीं इंग्रजी फौजेच्या कुमकेस लोक पाठवून व सामानाचा पुरवठा करून मदत केली. त्या कामगिरीबद्दल सरकाराने त्यांचे आभार मानले.
 व्यंकटरावांच्या कारकीर्दीत 'इलाखा प्रकरणा'चा निकाल इचलकरंजीकरांच्या तर्फेनें झाल्याचें मागें सांगितलेंच आहे. तो वाद तेथेंच संपला नाही. करवीरदरबाराने पुन्हा उचल खाल्ली व वारंवार तकरारी करून सरकारास अगदीं सतावून सोडिलें. उभयपक्षी वादाचे मुद्दे कोणते होते हें पूर्वी दर्शविलेच आहे.