पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकदा 'आउट' झालं की आपले सगळे प्रश्न संपतील हा गैरसमज मनात बाळगू नये. तुमचे आताचे प्रश्न कदाचित संपतील पण नवे प्रश्न उभे राहतील. कुणाच्याही दबावाखाली 'आउट' होऊ नये. 'आउट' होण्याची इच्छा मनातून यावी. याला अपवाद- काहीजणांना सांगायची पाळी येत नाही, काहीतरी कारणानी घरच्यांना कळतं किंवा संशय येतो. मग घरचेच लोक अगदी नाइलाजानी हा विषय काढतात. "मागच्या माहिन्यात माझ्या आईनं माझ्या खोलीत एक होमो पोर्नोग्राफिक मासिक पाहिलं आणि भांडं फुटलं.” 'आउट' होण्याचा भावनिक ताण खूप असतो. मनाची पूर्ण तयारी झाल्यावरच बोललेलं चांगलं. आज 'आउट' झालो आणि उद्या त्याचा ताण सहन न होऊन परत 'क्लोजेट'मध्ये जायचं अशी द्विधा मनःस्थिती नसावी. मन खंबीर करावं. आपल्या जवळचे लोक नक्कीच भावनिकदृष्टया आपल्याला ब्लॅकमेल करू शकतात. अभ्यास, पूर्वतयारी केल्याशिवाय, सगळ्या गोष्टींचा नीट विचार केल्याशिवाय 'आउट' होऊ नये. पूर्वतयारी आपल्या लैंगिकतेबद्दल आपलं काय मत आहे? आपण आपली लैंगिकता पूर्णपणे स्वीकारणं महत्त्वाचं आहे, तसं नसेल तर आपल्या विषयाची जास्तीत जास्त माहिती गोळा करावी, समजून घ्यावी; आऊट असलेल्या समलिंगी लोकांशी बोलावं; समलिंगी आधार गटात हा विषय मांडावा; एखाद्या संवेदनशील काऊन्सेलरबरोबर बोलावं. आपल्याला काय शंका आहेत, भीती आहे व गैरसमज आहेत त्याचं निरसन करून घ्यावं. या विषयावरची पुस्तकं वाचावीत. (काही पुस्तकांची यादी परिशिष्ट क मध्ये दिली आहे.) विवेक आनंद (हमसफर ट्रस्टचे सीइओ) म्हणाले, "स्वतःच्या लैंगिकतेबद्दल जर नकारात्मक भावना असतील तर त्या प्रथम गेल्या पाहिजेत. माझं नेहमी सांगणं असतं की जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वीकारत नाही तोवर तुम्ही 'आउट' होऊ नका.” कुणाला सांगावं? कुणाला पहिल्यांदा सांगायचं? एखाद्या ओळखीच्या समलिंगी व्यक्तीला ? का एखाद्या जवळच्या मित्राला ? भावाला? बहिणीला? आई-वडिलांना? ऑफिसमधल्या एखाद्या सहकाऱ्याला? यातला कोण आपल्याला स्वीकारायची जास्तीत जास्त शक्यता आहे? अशा व्यक्तीची निवडप्रक्रिया हळूहळू सुरू होते. ही निवड करताना त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे? ती व्यक्ती लगेच ही गोष्ट गावभर तर करणार नाही ना ? ती व्यक्ती इंद्रधनु... ८९