पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जर पुरुष समलिंगी असला व त्याच्या बायकोला ते कळलं, तर कधी कधी बायकोला घटस्फोट हवा असूनसुद्धा नवऱ्याची तो द्यायची तयारी नसते. नवऱ्याला समाजात भिन्नलिंगी जोडप्याची मान्यता हवी असते आणि हा स्वार्थ साधून तो बायकोला घटस्फोट देऊ इच्छित नाही. काही वेळा त्या समलिंगी पुरुषाला घटस्फोट घ्यायचा असतो पण त्याच्या बायकोची घटस्फोट द्यायची तयारी नसते. याला वेगवेगळी कारणं आहेत- आपण कमी पडलो असा न्यूनगंड; आपण परत माहेरी गेलो तर घरच्यांवर आपला भार पडेल ही काळजी; आपलं परत लग्न होईल की नाही ही शंका; एका कुटुंबाचं संरक्षण, आधार सोडून देण्यात वाटणारी अस्थिरता; स्त्रीनं एकटीने राहण्याची कल्पना सहन न होणं इत्यादी. मुलं नसली तर काही प्रमाणात घटस्फोट मिळण्यात अडचणी कमी येतात. जर मुलं असली तर त्यांची काय व्यवस्था करणार? आपण समलिंगी आहोत हे कळलं तर कोर्ट आपल्याला मुलांची कस्टडी देईल का? व्हिजिटिंग राईटस् तरी देईल का ? मुलांच्या भवितव्याचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आपल्याला सहभागी होता येईल का ? याचा विचार करावा लागतो. अर्थार्जनाचे प्रश्न नोकरी बहुतेक वेळा नोकरी मिळवायला व नोकरी टिकवायला आपण समलिंगी आहोत हे सांगणं परवडत नाही. आपण समलिंगी आहोत असं सांगितलं तर त्या नोकरीसाठी आपण सर्वात योग्य असूनही आपल्याला निवडलं जाणार नाही ही जाणीव असते. मुलाखत घेणाऱ्याच्या मनात समलिंगी लोकांबद्दल अनेक गैरसमज असू शकतात. अशा व्यक्तीला मी निवडलं तर लोक माझ्या बाबतीत काही गैरसमज करून घेतील का ?, हा माणूस ऑफिसमध्ये कसा वागेल ?, यानी कुणाशी असभ्य वर्तन केलं तर ?, हा कुणाला नादी लावेल का ?, इतर सहकार्यांना असा माणूस ऑफिसमध्ये चालेल का? आपली लैंगिकता लपवावी लागणं हा आपल्यावर होणारा मोठा अन्याय आहे हे जाणूनही काही करता येत नाही. कोणीच नोकरी दिली नाही तर काय खायचं? कसं जगायचं? म्हणून बहुतेकजण आपली लैंगिकता जाहीर करत नाहीत. पूर्वी एका नोकरीत, मी एका व्यक्तीला कामासाठी निवडलं होतं. तो कामासाठी अत्यंत योग्य होता. तो थोडा बायकी होता. त्याची लैंगिकता मला माहीत नव्हती. अंतिम मुलाखतीच्या वेळी जेव्हा मी, माझा मॅनेजर व तो बसलो तेव्हा माझ्या मॅनेजरनी त्याला पाच मिनिटात कटवलं. तो गेल्यावर कुचकटपणे मला म्हणाला, 'हे बायकी इंद्रधनु ८४ .....