पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. भेटत होतो तेव्हा एकाने विचारलं - "या लोकांना 'ठीक' करण्याचे सपोर्ट ग्रुप तुम्ही चालवत नाही का? तुमची संस्था तर उलटं काम करते. या अशाही उलट काम करणाऱ्या संस्था आहेत हे मला माहीत नव्हतं." अजूनही एमबीबीएस च्या अभ्यासक्रमात जी पुस्तकं आहेत त्यात समलैंगिकता हा आजार मानला जातो. त्यामुळेही डॉक्टरांचे स्वत:चे पूर्वग्रह बळावतात. व्यवसायाचाही एक भाग आहे. काही मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात की, 'समलिंगी केसेस हा आमच्या प्रॅक्टिसचा फार थोडा भाग आहे', पण येणाऱ्या व्यक्तीकडे गिऱ्हाईक म्हणून बघायची दृष्टी काही मानसोपचारतज्ज्ञांमध्ये आढळते. काही मनसोपचारतज्ज्ञ चारचौघात उदारमतवादी वक्तव्य करतात. 'हा आजार नाही' हे चार लोकांपुढे म्हणतात. पण खाजगीमध्ये एखादा 'पेशंट' समोर बसलेला असतो, तेव्हा मात्र त्यांचं धोरण बदलतं. एक 'एक्स पेशंट' म्हणाला, "मला एका मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं की 'चाचणीवरून दिसून येतं की तुम्ही पूर्णपणे समलिंगी आहात, पण तुम्ही लग्न करायला काही हरकत नाही. लग्नानंतर सारं काही सुरळीत होईल. " तर दुसऱ्या एका मनसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं, “आता डब्ल्युएचओ याला आजार मानत नाही. पण तू विचार कर, या देशात तुला असं असणं परवडेल का? मग तुझी इच्छा असेल तरच मी तुला बदलायचा प्रयत्न करीन. अर्थात या प्रयत्नांना यश येणार की अपयश हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तू जर मनावर घेतलं नाहीस तर यश येणार नाही." काही मानसोपचारतज्ज्ञ, समलिंगी लैंगिक कल बदलण्याचा मापदंड म्हणजे त्या व्यक्तीला लग्न करण्यास सक्षम करणं असा धरतात. म्हणजे समलिंगी पुरुषाला स्त्रीबरोबर संभोग करता आला पाहिजे. तसंच समलिंगी स्त्रीला तिच्या नवऱ्याबरोबर होणारा संभोग सहन करता आला पाहिजे. ( आई-वडिलांनासुद्धा आपल्या पाल्याकडून एवढंच हवं असतं.) लग्न झाल्यावर त्या समलिंगी व्यक्तीची व त्याच्या जोडीदाराची काय घुसमट होते याची कुणाला काहीही पर्वा नसते व आई-वडील आपल्या मुला/ मुलीच्या हिताच्या नावाखाली डॉक्टरांच्या वाटेल त्या अघोरी प्रयत्नांना मान्यता देतात. (नसलेला) आजार बरा करणं हे प्रयत्न (खरं तर अत्याचार हाच शब्द बरोबर आहे) अनेक प्रकारे केले जातात. अ) पुरुषांना पुरुषांची नग्न चित्रं दाखवायची. ते उत्तेजित झाले की त्यांना विद्युत शॉक द्यायचा. म्हणजे पुरुषांकडे पाहून त्यांना लैंगिक उत्तेजना येणार नाही. स्त्रीची नग्न चित्रे दाखवायची पण शॉक द्यायचा नाही. ब) पुरुषांची लैंगिक चित्रं दाखवायची आणि तो पुरुष उत्तेजित झाला की त्याला मळमळायला होईल, ओकारी होईल अशी औषधं, इंजेक्शनं द्यायची. इंद्रधनु... ६३