पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लैंगिक कल आणि लैंगिक वर्तन (Sexual attraction and Sexual behavior) अनेकांना वाटतं की ज्या व्यक्तीचा जो लैंगिक कल आहे त्या प्रमाणेच ती व्यक्ती लैंगिक वर्तन करते. लैंगिक कल व लैंगिक वर्तन या दोन गोष्टी वेगळया असू शकतात. त्यांचं स्पष्टीकरण खाली दिलं आहे. उदा. १ अजयला भावनिक/लैंगिकदृष्ट्या फक्त पुरुषंच आवडतात. याचा अर्थ त्याचा लैंगिक कल समलिंगी आहे. अजय फक्त पुरुषांबरोबरच संभोग करतो. याचा अर्थ त्याचं लैंगिक वर्तनही समलिंगी आहे. उदा. २. सविताला नववीपासून मुलांबद्दलच भावनिक/लैंगिक आकर्षण वाटतं. याचा अर्थ तिचा लैंगिक कल भिन्नलिंगी आहे. आता ती कॉलेजमध्ये आहे. तिच्या वर्गातल्या एका मुलावर तिचं प्रेम आहे. त्याच्याबरोबर तिला शरीरसुख घ्यायचं आहे पण तिने अजून तरी त्याच्याबरोबर शरीरसुख घेतलेलं नाही म्हणजे तिने अजून तरी भिन्नलिंगी लैंगिक वर्तन केलेलं नाही. उदा. ३. रमेशचा लैंगिक कल समलिंगी आहे. त्याने अजून एकाही पुरुषाबरोबर संभोग केलेला नाही. समाजाच्या दबावामुळे त्याने एका स्त्रीशी लग्न केलं व तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. याचा अर्थ रमेशचा लैंगिक कल हा समलिंगी आहे पण लैंगिक वर्तन हे भिन्नलिंगी आहे. प्रत्येक व्यक्तीचा कोणता तरी लैंगिक कल असतोच पण त्याचा अर्थ त्या व्यक्तीनी त्या कलाचं लैंगिक वर्तन केलेलं असेलच असं नाही. म्हणूनच समलिंगी लैंगिक आकर्षण असणं म्हणजे समलिंगी संभोग (वर्तन) करणं नाही. आपण वर उदाहरण ३ मध्ये पाहिलं की, रमेश समलिंगी असून भिन्नलिंगी लैंगिक वर्तन करतो त्याचप्रमाणे काही भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या व्यक्ती समलिंगी लैंगिक वर्तन (संभोग) करणाऱ्या असतात. अनेक पुरुष जे समलिंगी नाहीत किंवा स्वत:ला समलिंगी मानत नाहीत ते सुद्धा समलिंगी संभोग करतात. जर त्यांनी असुरक्षित (कंडोम न वापरता) संभोग केला तर त्यांना एखाद्या एचआयव्हीबाधित व्यक्तीपासून एचआयव्हीची लागण होऊ शकते. गुप्तरोग, एचआयव्हीचा प्रसार होऊ नये म्हणून या सगळ्यांना सुरक्षित संभोगाची माहिती देणं आवश्यक झालं. म्हणजे सुरक्षित संभोगाची माहिती फक्त समलिंगी व्यक्तींनाच देणं पुरेसं नव्हतं तर समलिंगी संभोग करणाऱ्या सगळ्या पुरुषांना देणं गरजेचं होतं. या उद्देशाने एमएसएम (MSM-Men who have Sex with Men) इंद्रधनु ५२ ...