पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कायद्याचा दृष्टिकोन - समलिंगी विवाह भारतात विवाहाचा अर्थ दोन भिन्नलिंगाच्या व्यक्तींचं धर्माने, समाजाने व कायद्याने मानलेलं लैंगिक नातं. बहुतेकांच्या मते विवाह धर्माशी निगडित आहे. धार्मिक रीती- रिवाज पूर्ण झाल्यावरच पुरुष व स्त्रीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणं अपेक्षित असतं. देव-देवतांचा आशीर्वाद मिळून, संस्कृतिक-धार्मिक क्रिया यथासांग पार पाडून मगच लग्न लागलं असं धरलं जातं. याच्या मागे देवाचा आशीर्वाद घेतला नाही तर पुढे या संसारावर संकटं येतील ही भीती असते. कोणताच धर्म समलिंगी जीवनशैलीला मान्यता देत नसल्यामुळे समलिंगी जोडप्याला धार्मिकदृष्ट्या मान्यता देणं चूक आहे असं अनेकांचं मत असतं. तरी काही समलिंगी जोडपी त्यांच्या समाधानासाठी विवाहाचे धार्मिक विधी करतात. शहरात जरी भिन्नलिंगी जोडपी लग्न न करता एकत्र राहताना दिसली तरी अजूनही बहुतांशी भागात याला समाजमान्यता नाही. त्या जोडप्याच्या देखत किंवा मागे अनेक वेळा त्यांच्याबद्दल कुजबुज होते. अशी नाती अनैतिक समजली जातात (त्याच्या मागे आमचा (समाजाचा) आशीर्वाद न घेता ही जोडपी एकत्र राहतात; आपल्या धर्माचा, संस्कृतीचा ही जोडपी अनादर करतात ही भावना असते). समाजात अनेकांना समलिंगी जीवनशैली मान्य नसल्यामुळे समलिंगी जोडप्यांनाही अशाच प्रकारच्या सामाजिक दृष्टिकोनाला सामोरं जावं लागेल. विवाह टिकावा, सुदृढ रहावा यासाठी कायद्याच्या अनेक तरतुदी आहेत, अधिकार आहेत (उदा. वारसा हक्क, विमा इ.). हे कोणतेच अधिकार कायद्याने मान्यता नसलेल्या जोडप्याला (मग ते नातं भिन्नलिंगी असो वा समलिंगी असो) मिळत नाहीत. भारतीय दंडविधान संहितेचं कलम ३७७ कायदा समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवत असल्यामुळे हा कायदा समलिंगी विवाहाचा अधिकार मिळवण्यासाठी सर्वात मोठा अडथळा आहे. या कायद्यामध्ये जोवर बदल होत नाही (समलिंगी संभोगाला गुन्ह्याच्या यादीतून काढलं जात नाही) तोवर समलिंगी विवाहासाठी झटता येत नाही. धार्मिकदृष्ट्या अशा लग्नांना जरी मान्यता मिळाली नाही तरी 'सिव्हिल मॅरेज'ची व्यवस्था सरकारला नक्कीच करता येऊ शकेल. सध्या या नात्याला कायद्याने मान्यता नसल्यामुळे समलिंगी जोडपी अनेक अधिकारांपासून वंचित राहिली आहेत. समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' शब्द लागू होत नाही. उदा. द पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट, १९७२. या अॅक्टमध्ये ‘कुटुंब'च्या व्याख्येत समलिंगी जोडीदार बसत नाही. या अॅक्टमधील कामगाराच्या 'कुटुंब' याची व्याख्या खाली दिली आहे- [44]

इंद्रधनु ... ४७