पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुखमैथुन, गुदमैथुन जर एका पुरुषाने कोणत्याही वयाच्या स्त्री किंवा पुरुषाबरोबर मुखमैथुन किंवा गुदमैथुन केला तर त्याला कलम ३७७ लागू होतं. जर एका स्त्रीने कोणत्याही वयाच्या स्त्री किंवा पुरुषाबरोबर मुखमैथुन केला तर तिला कलम ३७७ लागू होतं. या कायद्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी या कायद्यामुळे समलिंगी लोकांवर होणाऱ्या अनेक अत्याचारांवर न्याय मागण्यास अडचण येते. समलिंगी व्यक्तींना होणारा ब्लॅकमेल, गुंडांचा त्रास, जोडीदाराकडून झालेला छळ या सारखे गुन्हे फार थोड्या प्रमाणात पोलिसांपर्यंत पोचतात. या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करण्यासाठी सर्रास केला जातो. काही वेळा एखादी समलिंगी व्यक्ती कोणाबरोबर नातं जमवते. काही काळ हे नातं चालू राहिल्या नंतर भेटलेली व्यक्ती ब्लॅकमेल करायला लागते. अशा वेळी पोलिसांत तक्रार करणं अवघड होतं. माहीत असतं की, तक्रार केली की तो ब्लॅकमेलर तुरुंगात जाईल पण त्याच बरोबर आपणही ३७७ खाली अडकू का? ही भीती असते. "मी ठिकाणी जोडीदार शोधायला रात्री गेलो होतो. तिथं माझं लक्ष नसताना मागून एक पोलिस आला. त्याने माझी गचांडी धरली. म्हणाला, 'तुम्हा गांडू लोकांनी उच्छाद मांडलाय. चल ठाण्यात, तुला चांगला धडा शिकवतो'. मी खूप घाबरलो. माझ्या घरच्यांना माहीत नाही (की मी गे आहे). “मला सोडा' म्हणून त्याची विनवणी केली. मग तो मला थोड्या अंतरावर घेऊन गेला आणि मला त्याच्या बरोबर मुखमैथुन करायला लावला. मग मला सोडून दिलं. जाताना म्हणाला, 'परत इथं दिसलास तर चामडी सोलून काढीन.' आपल्याला पोलिस कस्टडीत नेलं तर आपण समलिंगी आहोत म्हणून आपल्यावर काय अत्याचार करतील हा विचार जरी मनात आला तरी अंगावर काटा येतो." ज्या व्यक्तीने त्याला ब्लॅकमेल केलं ती व्यक्ती साध्या वेशातील होती. तो खरंच पोलिस होता का? हे कळायला काही मार्ग नाही. काही वेळा 'ठाण्यात चल, नाहीतर पाकीट दे, गळ्यातील चेन दे' अशी धमकी दिली जाते. माणूस काहीही विचार न करता हे सगळं देऊन टाकतो. कोणाकडं दाद मागणार? काही गुंड, चोर या कायद्याचा फायदा चोरी करण्यासाठी करतात. गर्दीच्या ठिकाणी एखाद्या पुरुषाला इशारा करायचा. त्यानी प्रतिसाद दिला तर आपल्याला तो आवडलाय असं भासवायचं. त्याला विशिष्ट ठिकाणी घेऊन जायचं. मग आरडाओरडा करायचा 'ह्यानी माझा विनयभंग केला'. लगेच त्याच्या जवळ असलेले त्याचे साथीदार गोळा होतात. 'मारा साल्याला', 'पोलिस ठाण्यात घेऊन जाऊ' असं म्हणून त्या इंद्रधनु ...