पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

है (फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया) यांची स्थापना झाली. बहुतेक कुटुंबनियोजनाचे कार्यक्रम स्त्रियांवर राबवले जात होते. (आजही कुटुंबनियोजन म्हणजे स्त्रीचा प्रश्न समजला जातो.) आणीबाणीच्या काळात कुटुंबनियोजनाच्या ज्या सक्तीच्या पध्दती राबवल्या गेल्या त्यामुळे कुटुंबनियोजन विषय वादग्रस्त झाला. १९८० च्या दशकात एचआयव्ही विषाणुचा शोध लागला. त्याकाळी एचआयव्ही वर कोणतंही औषध उपलब्ध नसल्यामुळे समाजात भीती पसरली. लैंगिक शिक्षणाचा अभाव, एचआयव्हीबद्दलचं अज्ञान, नीतीमूल्यांची जबरदस्त पकड या सगळ्यामुळे एचआयव्हीबाधित लोकांवर अत्याचार होऊ लागले. 'बीभत्स पाश्चात्य संस्कृतीचं हे फळ आहे', 'व्यभिचारी लोकांना चांगली अद्दल घडली' असं लोक म्हणू लागले. कोणी कसं लैंगिक आचरण करायचं याची नीतिमत्ता शिकवण्याचं नवं पर्व सुरू झालं. संस्कृती आणि नीतिमत्तेचा आधार घेऊन लैंगिक वर्तनावर नियंत्रण घातलं जावं असा विचार मांडला जाऊ लागला. या वातावरणात लैंगिक शिक्षणाचा जन्म झाला. लैंगिक शिक्षण वयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे ही धारणा वाढू लागली. ही धारणा बनत असताना लैंगिक शिक्षण हे पालकांनी घ्यायला हवं असा एक मुद्दा उपस्थित होत होता तर अनेक पालक हे काम कोणीच करू नये या धारणेचे होते. लैंगिकतेबद्दल बोलण्यास बहुतेक सर्व शिक्षक, पालक अत्यंत नाखूष होते. लैंगिक शिक्षण देण्याने मुलं/मुली चुकीच्या मार्गाला लागतील ही अनेकांना भीती होती. आज जे काही लैंगिक शिक्षण दिलं जातं ते बहुतांशी जुजबी असतं. भिन्नलिंगी लैंगिकतेबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जात नाहीत. लैंगिक शिक्षण हे जनसंख्येला आवर घालणं व एचआयव्ही ला आवर घालणं या दोन मुद्द्यांतून जन्माला आलं आहे. या दोन्हीत ‘आवर' हा शब्द महत्त्वाचा आहे. वयात आल्यानंतर मुलां-मुलींच्या लैंगिकतेला आवर घालणं, लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली मुला/मुलींच्या मनात लैंगिक सुखाविषयी भीती निर्माण करणं सर्रास घडतं. समाजाला पाहिजे तेव्हा, समाजाला मान्य असलेल्याच कारणासाठी, समाजाला मान्य असलेल्याच व्यक्तीबरोबर व समाजाला मान्य असलेल्याच प्रकारे लैंगिक जवळीक साधली गेली पाहिजे हीच या मागची इच्छा. अशा दूषित वातावरणात आजची मुलं-मुली वाढतात. लैंगिक गरजा, लैंगिक सुखाची आवड, लैंगिकता, मानसिक आरोग्य आणि लैंगिक अधिकार यांचा कुठेही विचार होत नाही. जिथे भिन्नलिंगी लैंगिकतेची ही स्थिती तिथे समलिंगी जीवनशैली इच्छिणाऱ्यांची काय अवस्था असणार? जगू इंद्रधनु ... २४