पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

अंतःकरणांत भिनल्यामुळे आकाशांतील निरनिराळ्या खगोलांचें व इतरांचें कौतुक करण्यांत गुंतल्यावेळी त्यांनीं सूर्य, चंद्र, नक्षत्रें, तारे, मेघ, ऋतु, मास, दिवस वगैरेंची जागोजागीं स्तोत्रे गाइलीं आहेत. तैत्तिरेय ब्राह्मणांत विश्वाच्या अनंतत्वाबद्दल पुढीलप्रमाणे उल्लेख सांपडतो.

 लोकोसि स्वर्गोसि । अनंतोस्यपारोति । अक्षितोस्यक्षयोसि । म्हणजे तूं लोक आहेस; स्वर्ग आहेस, अनंत आहेस; अपार आहेस; अक्षित आहेस व अक्षय आहेस. अशा या अद्भुत व अवाढव्य विश्वांत आमचें वासस्थान जी पृथ्वी ती अगदींच लहान असल्याचे त्यांनी उद्गार काढिले आहेत.

य उद्दचीन्द्र देवगोपाः सखायस्ते शिवतमा असाम ।
त्वां स्तोषाम त्वया सुवीरा द्रावीय आयुः प्रतरं दधानाः ॥

ऋ० १-५३- ११.

 ( अर्थ - खरोखर, हे इन्द्रा, पृथ्वी जर दसपट मोठी वाढेल आणि मनुष्याचें आयुष्य चिरकाल टिकणारें होईल, तरच हे उदार देवा, तुझें विख्यात सामर्थ्य, शक्ति आणि पराक्रम ह्या बाबतींत द्युलोकांत मावूं लागेल.) या सूक्तांत मनुष्य- प्राणी हा मर्त्य आहे, हें जसे दाखविलें आहे, तसेंच पृथ्वीहून द्युलोक किती तरी मोठा आहे असें ध्वनित केलें आहे. ज्या कालाच्या तडाख्यांत सर्व स्थिरचर पदार्थ सांपडले आहेत, त्याच्या अनाद्यनंतत्वाबद्दल पुढील विवेचनावरून कल्पना होण्याजोगी आहे. मृत्युलोकांतील मनुष्यप्राण्यांच्या कालगणनेप्रमाणें चार अब्ज बत्तीस हजार वर्षे संपतील, तेव्हां जगाचा कर्ता मानलेला जो ब्रह्मदेव त्याच एक दिवस भरणार. अशा रीतीनें ब्रह्मदेवाचीं १०० वर्षे पुरीं होतील तेव्हां तो व त्याची सृष्टि नाशाप्रत जाईल. (अर्थात् कालाची सत्ता ब्रह्मदेवावरही चालते, मग बिचारा मनुष्य त्याच्या माऱ्यांतून कसा चुकेल ? तो मारा चुकवून अमर होण्याचा मार्ग शोधून काढण्यांत प्राचीन ऋषी गढून गेले, त्याचें कारण तरी हेंच कीं, या कालासही दाद देऊं नये असे त्यांस वाटलें.) जगाची उत्पत्ति होऊन सध्यां ब्रह्मदेवाचीं ५० वर्षे झाली. यावरून किती वर्षांमागें हें जग उत्पन्न झाले, त्याची गणती करावी. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपेपर्यंत १४ मन्वंतरें होतात. त्यांपैकीं स्वयंभु, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत व चाक्षुष हीं मन्वं- तरें मागें पडून सध्यां वैवस्वत मन्वंतर चाललें आहे. यानंतर सावर्णि, दक्ष- सावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, देवसावर्णि आणि इंद्रसावर्णि हीं