पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना



 श्री. पु. स. तथा दादा गोरे हे खरे म्हणजे माझे जवळचे नातेवाईक. त्यांची धाकटी सून सौ. विद्या व मी सख्ख्या बहिणी. आम्ही दोघीही त्यांना अति जवळच्या वाटतो. सौ. विद्याला तर ते आपली कन्याच मानतात व माझा त्यांच्याशी परिचय जसजसा वाढत गेला, आमचे विचार जुळू लागले तसतशी त्यांची माझ्याही वरील माया वाढत गेली. हे आमचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत. मी स्वतः आधुनिक वैद्यकाची पदवीधर. सुरुवातीस चार-पाच वर्षे सरकारी नोकरी केली व नंतर खासगी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. माझ्या अनुभवातून मला असे आढळले की अत्यंत आधुनिक अशा या वैद्यकीय पद्धतीमध्ये सुद्धा पूर्ण विकारमुक्ती देण्याची शक्ती नाही. आम्ही निरनिराळ्या तपासण्या व स्वतःचा अनुभव यावर आधारित औषधोपचार करतो. पण त्यामुळे लक्षणानुसार उपचार करूनही विकारमुक्ती मिळतेच असे नाही. अनेक विचार परत परत उद्भवतात व ही तीव्र औषधे घेऊन प्रतिकारशक्ती कमी कमीच होत जाते, व औषधांना प्रतिसाद मिळण्याचेच थांबते. तेव्हा यापलीकडे काही मार्ग आहे का अशी समस्या माझेपुढे उभी राहिली. अभ्यासातून असे अनुभवास आले की उपचारांपलीकडे फार मोठे क्षितीज आहे. सर्वात आधी देह-मनाचा संबंध विचारात घेणे इष्ट असते. मनाची उन्नत अवस्था तुमची विकारमुक्तीची शक्ती वाढवते तर अवनत स्थिती देहाच्या स्वास्थ्याचा नाश करते. भय, राग, लोभ, अति कामवासना ह्या भावना देहाच्या शत्रू तर प्रेम, माया, त्याग या भावना मित्र. यासाठी पातंजल योगसूत्रे, गीता, ज्ञानेश्वरी असे

ग्रंथ यांचा अभ्यास असणे जरूर आहे. यानंतर विचार येतो तो आहार व योगाभ्यास यांचा.