पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाहीर होताच ते सोंग हजर होते. वाजवणारांचे दोन ताफे असतात. रस्त्यावरच ही सोंग इकडून तिकडे नाचतात. अंदाजे २०० मीटर सडक (रस्ता) त्यासाठी वापरला जातो. सोंगांबरोबर बघ्यांची अमाप गर्दी उसळलेली असते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला तुफान गर्दी झालेली असते. या निमित्ताने त्या गावात एक जत्राच भरते. रात्रभर दुकानातून खाणे पिणे, चहा पान बिडीतंबाखू देणे घेणे चालूच राहते. ढोलकी, संबळ वाजवून त्याला 'थाप' म्हणतात. ती देऊन बोहडा सुरु होत असल्याची इतरांना सूचना मिळते व प्रचार होतो. प्रत्येक पाड्या पाड्यातून हा बोहडा पाहणाऱ्या तरुण तरुणीच्या हळूहळू ओळखी होऊन जोड्या जमायला लागतात. पण मूळ उद्देश लग्न जमविणे हा नाही. पोरं पोरं मिळूनच हा कारभार करतात. बोहाड्याच्याच ओळखीच्या आधारावर पुढे त्यांची मागणी घालून आईबापांच्या संमतीने लग्न जमतात. परस्परांच्या पसंतीचा भाग या बोहाड्यात होऊन जातो. पुढे रीतीनुसार लग्न होऊन सुरळित संसारही थाटतात. पण बोहाडा हे देवाचे काम आहे, ते लग्न जुळविण्याचे केवळ स्थळ नव्हे, मात्र पूर्वीच्या काळी दळणवळण नसल्याने याच सणाच्या, बोहाड्याच्या निमित्ताने भेटी गाठी होतात. सोईर संबंध जुळतात आणि काही वेळा लग्न संबंध तुटतातही. कारण घरात बायको असूनही अन्यत्र ओळखीतून प्रेम संबंध वाढतात, असे पण कचितच घडते, असे म्हणतात. खेळीमेळीने जातपात विसरुन, दंग होऊन, सगळे आदिवासी एकत्र येतात.

 नागपंचमी ते दीपावलीपर्यंतच तारपा वाद्य वाजते आणि त्याच ताला सुरात नाच गाणे चालू असते. तसे होळी, फाल्गुनापासून तो पाऊस पडेपर्यंत बोहाडा चालू असतो. शेतीची कामे नसतात, म्हणून हे मनोरंजन आणि करमणुकीचे साधन ठरते. त्यातच भक्तीने देवपूजा पण बांधली जाते. बोहाड्याच्या शेवटच्या दिवशी देवीच्या सोंगाला बोकडाचा बळी देतात. जो बोकड देतो त्याच्या शेतावर एक दिवस सगळे मिळून काम करतात. शुक्रवारी गणपतीसमोर नारळ फोडून बोहाड्याला प्रारंभ होतो. आणि मंगळवारी देवीला बोकड अर्पून सांगता होते. सोमवारी प्रत्येक सोंगाला नारळ फोडून वाहतात. सोंगावरून पैसे शेवटच्या दिवशी जास्त प्रमाणात ओवाळले जातात. कापणीला, धरणाच्या कामाला बाहेर गावी गेलेले आदिवासी हमखास परत येतातच. ज्याचा त्याचा सोंग नाचविण्याचा

५८