पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५५

 वाईट स्वभावाचा माणूस इतरांस दुःख देण्याच्या ऐवजीं स्वतः दुःख करून घेतो.
 " इतरांस नेहमीं त्रास दिल्यामुळे त्यास स्वतःस त्रास होतो; व कोणतीही गोष्ट न आवडणें ह्यांतच त्यास आनंद वाटतो. " कधीं मनासारखें न झाल्यामुळे त्याला कधीं सुख होत नाहीं. पण, इतरांस दुःख देण्याचें त्याच्या हातून बरेंच होतें, त्यांत संशय नाहीं. आजुबाजूच्या मंडळीस सुखी ठेवण्यासाठीं पदरास फारसा खार लावावा लागत नाहीं; पण, नुस्तें मनांत चांगलें वागत असून उपयोग नाहीं. लोकांस सुखी करण्यास चातुर्य अनुभव व अभ्यास हीं लागतात. कोणतेंही काम - मग तें वाईट असो वा बरें असो- चांगल्यारीतीनें करण्यास संवय करावी लागते.
 ममताळूपणाच्या व कळकळीच्या वर्तणुकीमुळे वाटेल तें क- रितां येतें. " चालचलणूकीवरून माणसांची परीक्षा होते" अशी एक जुनी ह्मण आहे. पुष्कळ माणसें आपल्या चालचलणु- कीवर तरतात व पुष्कळ मरतात हें खरें आहे. मुख्य प्रधान जेव्हां आपलें मंत्रीमंडळ निवडून काढितो, तेव्हां शहाणपण, वक्तृत्व, अथवा हुशारी, व सद्गुण ह्यांच्याकडे नुस्तें लक्ष देत नाहीं; तर स्वभावाकडेही लक्ष देतो. ह्मणजे इतरांशीं मिळून रहाणारीं माणसें तो निवडून काढितो.

 उद्धटपणा ह्मणजे मनःसामर्थ्य नव्हे. आपल्या अंगचा दुर्ब- ळपणा झांकण्याकरितां कधीं कधीं माणसें उद्धटपणा स्वीकारितात. शेक्सपीयर अॅन्टनीच्या तोंडून त्रूटसविषयीं असें ह्मणवितोः- " त्याचें वर्तन सौम्य होतें व स्वभावांतल्या प्रकृतींचें अशा रीतीनें एकीकरण झालें होतें कीं, सृष्टीनें प्रत्यक्ष प्रगटून हा "खरा माणूस" असें सर्व जगाला सांगावें. "


 १ पोप.