पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



(८)

समावेश करण्यांत येत आहे काय ? मग आयुर्वेदाच्या शिक्षणांत मात्र इंग्रजी वैद्यकाची आवश्यकता कां ? आणि जर भासेल तर आयुर्वेद अपूर्ण अशी ती कबुलीच नाही काय? ही आवश्यकता हल्ली काही ठिकाणी स्वीकारली जात आहे. याचा अर्थ अविश्वास असाच उघड आहे. मग ही पद्धत कोणी डॉक्टराने अथवा वैद्याने स्वीकारली असो. अशी आवश्यकता भासते याचे कारण त्रिदोषांची योग्य ती कल्पना नाहीं अथवा आयुर्वेदाच्या शास्त्रीयत्वाविषयी असावा तसा आदर नसल्याने योग्य कल्पना करून घेतली नाही असेच म्हणणे भाग आहे.
 त्रिदोषांविषयी थोड्या फर प्रमाणांत विचार सध्यां चालू आहेत त्यालाच अनुसरून हाही एक प्रयत्न आहे. वातादि त्रिदोषांची आयुर्वेदीय कल्पना आणि त्यांची व्यवहार्यता यांना अनुसरून ही एक विचारांची पद्धती विचारी वाचकांपुढे ठेविली आहे. सदर पुस्तकांत स्वीकारलेली विचारपरंपरा केवळ आयुर्वेदाचे आधारानुसार आहे. कितपत पटते तें वाचकांनी ठरवावयाचे. वादग्रस्त ठरलेल्या त्रिदोषांविषयी विचारांची एक दिशा येवढी गोष्ट ध्यानी घेऊन वाचकांनी विचार करावा. सदर पुस्तकांत शक्य तों त्रिदोषांचे स्वरूप व्यवहार्य कसे ठरतें याविषयी विचार शक्य तितक्या सोप्या भाषेत करावयाचा हे धोरण स्वीकारले आहे. तरी देखील जितकी सुबोध भाषा असावयास पाहिजे तितकी नाही ही जाणीव लेखकाला आहे. परंतु याचे कारण शास्त्रीय परिभाषा न सुटावी हे आहे. सदर पुस्तक वाचीत असतां आयुर्वेदीयांना काही ठिकाणी थोडा प्रचलित समजुतीला विरोध वाटण्याचा किंवा अर्थाची अतिव्याप्ति स्वीकारल्याचा भास होईल. परंतु एकंदर शास्त्रीय व्यवहारांतील विरोध टाळण्याला तो अवश्य आहे असें विचारांति ध्यानी येईल. आयुर्वेदाच्या मूलतत्वांविषयीं गैर समज दूर होऊन त्याची व्यवहार्यता व दर्जा वाढावा या एकाच उद्देशाने सदर प्रयत्न आहे व तो यशस्वी होण्यासाठी आयुर्वेदपारंगत व आयुर्वेदाभिमानी यांनी आयुर्वेदीय दृष्टीने त्याकडे पाहावें अशी नम्र विनंती आहे.

 आयुर्वेदीयांचा नम्र, 
पुरुषोत्तम सखाराम वैद्य हिर्लेकर.