पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

     अस्सं माहेर सुरेखबाई

माझ्याबाई माहेराला मायंदळ मायाळू लोक
गाव सुधारलं अन् पोरांचं जाग्यावर डोकं ॥

 बाया माणसांना कामाचा भार, हिंडतोय बाप्या दारोदार
 पोरांचा भार अन् गोंधळ फार, खाण्यापिण्याची मारामार
 हे नाही माहेरी घरी अन् बाहेरी, समद्यांचं वागणं येक॥

निर्मळ गोठा निर्मळ चूल, हसतंय खेळतंय निर्मळ मूल
गोठ्यात गाई न् दुधाचा पूर, मुबलक खाणं न् बाटली दूर
सासर असलं माहेर तसलं, लई लई न्यारा झोक ॥

 तालीम देऊळ, लेझिम, ढोल, शिवार हिरवं तालात डोलं
 भांडण, तंटा चहाडी नाही, भूतखेत करणी न् कुभांड नाही
 सावकार सरला, मारवाडी मेला, समद्यांचं व्यवहार चोख॥

बाया बाप्यांना कामाची घाई, रिकाम्या गड्यांची भजनाची घाई
मुलगा न् मुलगी शाळंला जाई, रिकामा माणूस पारावर नाही
सुनेला छळणं कोर्टात पळणं, समद्यांच टळलंय धोकं ॥

 माहेर मोठं न सासर खोटं, निसतच रडण्यात मायंदळ तोटं
 भांडण आवरु, घरदार सावरु, बाप्यांच्या जोडीनं घरदार सावरु
 गरीबी टाळू, दागिनं माळू सोन्याला देऊन ठोकं ॥

-----

७६           आम्ही बी घडलो ।