पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुकान, भांडवल किती म्हणाल तर ५०० रुपये फक्त पण धडपड किती म्हणाल तर आभाळभर- म्हणून सुचतं काय करावं ते!

सोताच्या हिंमतीवर .....

 स्वत:च्या हिंमतीवर मोठ्या केलेल्या उद्योगाची सुरूवात बचत गटाच्या उलाढालीच्या हिंमतीतून झाली असं वेल्ह्याची द्वारकाताई सांगत होती. तिचे अनुभव ऐकायला अशाच सान्या जमल्या होत्या. द्वारकाताई सांगत होती.
 'दाराला टांगलेली किटली वायाबरोबर झोका खात हुती. अन् प्रत्येक झोक्याबरोबर मला सांगत हुती मला वापर ! मला वापर !' 'ऐकलं. ऐकलं. द्वारकाताई म्हणाली किटली उचलली. चहा, साखर, पेले खरेदी केले. ५० रुपये खरचले. अन् आमच्या गावातच रस्त्यावर चहाची टपरी सुरू केली. अवं हिंमत बांधल्याबिगर काय तरी हुईल का? तशीच म्या हिंमत बांधली. अनवाढवत-वाढवत सोताचं हाटेल बी टाकलंय.आमच्या गावात धरण बांदत्यात. त्याचं लई गि-हाईक सकाळ -दुपार -संध्याकाळ माझ्या हाटेलात येतंय .सोताच्या हिंमतीवर, सोताच्या हक्काची कमाई खायला गावतीय.”
 “गटात यायला लागल्यापासूनच यवढी सुधारली द्वारकी. आधी कुठं येणं नाय, जाणं नाय, घरचं कुणी बी इचारत न्हवतं. आन् आतापार बी. डी. ओ. पातुर नाव पोचलय. मागच्या खेपेला आपल्या गावात शिक्षकांचं शिबिर हुतं. तर द्वारकी काम पायजे म्हणून पार बी. डी. ओ. कडं गेली. त्यांना आपल्या गटाची समदी म्हाइती सांगितली अन् सा शिक्षकांसाठी डबं करायचं ठरवलं . आन् गटाच्या मदतीनं पार बी पाडलं. तशी अडाणीच! शिक्षण नाय, त्याच्यामुळं हातावरचं पोट. पण आपल्याला फायदा पायजे , तर आपुनंच हात-पाय हालवायला हवं." संजाबाई म्हणाली.

२६           आम्ही बी घडलो।