पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गट कसे चालतात ?
गटामध्ये नियम असे ठरले..
 घरकामातून, मोलमजुरीतून, शेती- भातीतून सवड काढून महिला गटबैठकीसाठी जमायला लागतात. गटाचे सगळेच व्यवहार नव्याने शिकतात. एकमेकींच्या आणि संस्थेच्या मदतीनं त्या हळूहळू एक - एक गोष्ट समजून घ्यायला लागतात, गटाला हळूहळू एक आकार यायला लागतो. जरा गटा-गटातून फिरून बघूया बरं काय समजून घेत आहेत आणि काय काय ठरवत आहेत आपल्या मैतरणी.
सेवाशुल्क किती भरायचं?
 डोंगराच्या कुशीतलं हे कुसगाव. नव्यानेच सुरू झालेला गट. गटात १८ जणीच आहेत. प्रत्यकीचे २५ रुपये असे एकूण ४५० रुपये जमलेत. जिजाआजीला उचल पाहिजे. उचल घ्यायची म्हणजे ती फेडायची कशी हे ठरवायला पाहिजे. गावकीच्या फंडामुळे कर्ज फेडताना कर्जाच्या रकमेबरोबर रक्कम वापरल्याबद्दल सेवाशुल्क पण द्यायचं हे सगळ्यांना माहित होतंच. संस्थेच्या ताईंनी विचारले, “सेवाशुल्काचा दर किती ठेवायचा?" काहीजणी गप्प बसल्या. काहीजणी म्हणाल्या, “तुमीच सांगा, आमाला काय कळतंय त्यातलं" ताईंनी विचारलं.
 पैसे जमा कोण करतं - आम्ही.
 उचल कोण घेणार - आम्ही.
 फेड कोण करणार - आम्ही.
 मग सेवाशुल्काचा (व्याजाचा) दर कोण ठरवणार ?
 आता महिला विचार करायला लागल्या.

तुम्ही बी घडाना ॥         १३