पान:आमची संस्कृती.pdf/75

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


६८ / आमची संस्कृती
एखादी गोष्ट पटली व समाजाला जरी ती पटली नाही तरी त्याप्रमाणे आचरण करणे, त्यासाठी त्याग करणे व ती समाजाला पटवण्याचा वारंवार अप्रतिहत प्रयत्न करणे हे ते आपले कर्तव्य समजत. महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र हा त्यांचा लेख अति वाचनीय व हृद्य झाला आहे. त्यात त्यांनी 'स्नेह दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि।आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति में व्यथा।।' हे उत्तररामचरितांतील रामाचे वचन उदधृत केले आहे. केवळ लोकप्रिय होण्यासाठी आपल्या सदसदविवेकबुद्धीला पटलेल्या गोष्टी टाकून देण्याचा मार्ग त्यांना बिलकूल पसंत नव्हता. ते म्हणतात‘लोकछंदानुवर्तन (ह्या लेखकास) अशक्य झाले आहे. इतकेच नाही तर लोकांस अप्रिय परंतु पथ्यकारक असे विचार त्यांच्या मर्जीविरुद्ध पुन:पुन: त्यांच्यापुढे आणणे हेच आपले कर्तव्य व जीविताचे सार्थक, अशी त्यांची दृढ़ कल्पना झाल्यामुळे जनसमूहाच्या रोषाचे व उपहासाचे स्थान त्याने आपणास करून घेतले आहे. 'इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार' ही खडतर प्रतिज्ञा करून त्यांनी संबंध आयुष्यभर ती आचरणात आणून दाखविली. अमकी गोष्ट चांगली का वाईट, ह्याचा निर्णयच झाला नाही तर कृती होणे कठीण; पण तो निर्णय होऊनही वाईटाचा प्रतिकार व चांगल्याचा अंगीकार आज आपल्या हातून होत नाही.

 धैर्य, कणखरपणा व झुंजार वृत्ती कोठे गेली?
 त्यांच्या वेळी टिळक काय किंवा आगरकर काय, आपल्या साध्या राहणीचा गाजावाजा करीत नसत. अंत:शुद्धीसाठी जाहिरात देऊन उपास करण्याची गरजही त्यांना भासत नसे. सुधारणा करण्यासाठी कंठशोष करीत असताना काही सुधारकांनी दुर्वर्तन केले म्हणजे लगेच सुधारणा नकोत असे म्हणण्याइतका त्यांचा बुद्धिवाद व ध्येयवाद कच्चा नव्हता. एखादी गोष्ट योग्य व न्यायाची असे समजल्यावर ती अंमलात येण्यासाठी जिवाचा आटापिटा करावयाचा एवढे त्यांना माहीत होते. अमका असे वागला- दे आपले प्रयत्न सोडून, तमक्याने वाईट वर्तन केले, कर उपास, अशा त-हेने मूळ मुद्याशी संबंध नाही अशा गोष्टी पुढे करून ते ध्येयापासून दूर गेले नाहीत. ती माणसे ध्येयाने वेडीपिशी झाली होती. त्यांना स्वत:च भान राहिले नव्हते. दुर्दैवाने हल्ली आम्ही तसे नाही. स्वत:चे, स्वत:च्या