पान:आमची संस्कृती.pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / ६९

 कुटुंबाचे, स्वत:च्या अधिकारयोगाचे आम्हांस इतके भान आहे की, कोणतीही गोष्ट करताना क्षणभरही आम्ही स्वत:स विसरत नाही.
 'इष्ट वाटेल ते बोलेन आणि शक्य ते करीन' असे म्हणण्यास आत्मविश्वास दांडगा पाहिजे. मन:पूतं समाचरेत' म्हणताना स्वत:च्या मनाच्या शुद्धतेची व निर्मळतेची स्वत:ला शंका असता कामा नये. मनोमालिन्य व मनोदौर्बल्य ह्या लोकांच्या आसपास नव्हते. मग आज ५० वर्षांनीच आम्ही इतके दुर्बल व भेकड कसे बनलो हे कळत नाही. मोठेपणाची, विशाल वृत्तीची, झुंजारपणाची परंपरा आज कुठे नाहीशी झाली? बुद्धी नष्ट झाली असे वाटत नाही. भाषावार प्रांतरचनेच्या बाबतीत महाराष्ट्रावर अन्याय झाला हे पटण्याइतकी अक्कल सर्वांना आहे; पण त्या श्रद्धेवरहुकूम वागण्याचे धैर्य, कणखरपणा व झुंजार वृत्ती मात्र नाहीशी झालेली दिसते; असे का?
 माणसाला दोन तहेने लढा द्यावा लागतो; परकीयांशी व स्वकीयांशी. परकीयांशी लढा देताना काही लोक धैर्याचे मेरू असतात. स्वकीयांशी, आप्तांशी झगडण्याचा प्रसंग आला की धैर्य गळून जाते. ज्यांच्याशी झगडा करावयाचा ते वयाने मोठे असतात. त्यांचा शब्द प्रमाण मानण्यात सर्व बालपण व तारुण्य गेलेले असते. त्यांच्या आचारविचारांचा कित्ता पुढे ठेवून आपल्या मनाला, वृत्तीला वळण लागलेले असते, त्यांनी भरणपोषण केलेले असते. त्यांनी मोठ्या पदाला चढविलेले असते. भक्ती, प्रेम, अनुयायीपणा वगैरे हजारो नाजूक बंधनांनी माणूस अशा आप्तांशी जखडलेले असते. अशांच्या मनाविरुद्ध जाण्याचा कणखरपणा प्रत्येकाला साधत नाही. महादेव गोविंद रानडे ह्यांनी अशा प्रत्येक प्रसंगी माघार घेतली हे सर्वांना माहीतच आहे. प्रत्यक्ष झगडा करणेच कठीण असते असे नव्हे. तर आपल्या माणसांचे विचार व कृती ह्यांचे योग्य मूल्यमापन करणेही आपुलकीच्या भावनेमुळे शक्य होत नाही. ह्या अनिवार मायेमुळे दृष्टीवर आवरण पडते, सत्यासत्याचा विवेक राहत नाही व मनुष्य अर्जुनाप्रमाणे कथं भीष्मं अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन।इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजा अरिसूदन' असे म्हणून हीनदीन होऊन राहतो. अशा लोकांचे वर्णन आगरकरांनी उत्कृष्ट केलेले आहे. अशा लोकांना जे दैन्य येते तेच आज महाराष्ट्रातील पुढा-यांना आले आहे.