पान:आमची संस्कृती.pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ३३

केली पण त्यांच्या राजवटीत जुन्या कुटुंबव्यवस्थेत जे फेरफार झाले तेवढे गेल्या हजार वर्षांत झाले नाहीत. काही फेरफार यंत्रयुगाच्या बदललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे झाले, व बरेचसे इंग्रजी समाजजीवनाच्या अनुकरणाच्या इच्छेने आमच्याच लोकांनी केले. इंग्रजांना अगणित कारकून, पट्टेवाले, मास्तर व सैन्यांतील शिपाई लागत असल्यामुळे तरुण पुरुषांना वाडवडिलांचे घर सोडून स्वतंत्र कमाईची शक्यता उत्पन्न झाली. उद्योगधंदे व गिरण्यांमुळे गरीब शेतमजुरांना स्वत:च्या खेड्याबाहेर पोटाचा उद्योग मिळाला, आणि केवळ शेतीवर आधारलेली एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू नष्ट होऊ लागली. ज्याला कोणत्या तरी जमिनीच्या तुकड्यात मालकी नाही असे माणूस इंग्रजांच्या राजवटीआधी भिकाच्याखेरीज नव्हते. जसजसे लोक पोटाकरिता बाहेरगावी राह लागले. तसतसा त्यांचा मूळ घराशी संबंध कमी होऊन सामायिक कुटुंबातील जमिनीच्या तुकड्याच्या मालकीबरोबर येणाऱ्या सामायिक कुटुंबाच्या कधीही न भागणाच्या गरजा पुरवणे जड वाटू लागले, व हळूहळू अशा सामायिक कुटुंबाशी संबंध तोडण्याकडे प्रवृत्ती वाढत गेली. केवळ नोकरीधंद्यावर पोट भरणाच्या लोकांचा वर्ग निर्माण झाला. आईबाप व मुले, क्वचित एखाददुसरे वडील माणूस, अशी सुटसुटीत कुटुंबे दिसू लागली. ही कुटुंबे शिक्षण घेऊन झपाट्याने पुढे आली. इंग्रजी वाड्यातील कौटुंबिक जीवन हा या समाजाचा आदर्श होता. हिंदुस्थानात झालेले बरेचसे सामाजिक कायदे ह्या समाजाच्या प्रेरणेने झाले; बहुसंख्य लोकांना या सुधारणांची गरज वाटली म्हणून नव्हे. त्या सुधारणांना अतिशय तीव्र विरोधही झाला नाही व त्यांचा प्रसारही झाला नाही. बरेचसे कायदे दफ्तरीच राहिले. बरेच कायदे व्याप्तीच्या दृष्टीने अगदी मर्यादित स्वरूपाचे होते, व बरेच मूलगामी स्वरूपाचे असूनही व्यवहारात निरुपयोगी ठरले. त्यांतील बरेच कायदे विभक्त कुटुंबाच्या गरजेमुळे झाले. स्त्रियांना विभक्त कटुंबात जे महत्त्वाचे व मानाचे स्थान मिळते ते मोठ्या एकत्र कुटुंबात मिळत नाही, व त्यांची स्थिती सुधारण्यासाठीही पुष्कळ कायदे झाले. विलायतेतील स्त्रियांना हक्क मिळविण्यासाठी फार कष्ट पडले, येथील स्त्रियांना ते विनासायास व ते टिकविण्याची पात्रता अंगी येण्याच्या आतच मिळाले. नव्या राजवटीत या बाबतीत पाऊल मागे पडले असे वाटत नाही.