३२ / आमची संस्कृती
एकछत्री अंमलामुळे उत्पन्न झालेल्या एकभारतीय जाणिवेला त्यामुळे जोर मिळाला. ह्या नव्या बुद्धिजीवी वर्गाच्या महत्त्वाकांक्षेची पूर्ती व्हावयास सबंध भारताचे क्षेत्र आवश्यक होते. ह्यांच्याच जोडीला एका नव्या अखिल भारतीय व्यापारी वर्गाचाही प्रादुर्भाव त्या अंमलाखाली झाला. पूर्वीच्या प्रांतिक राज्यांतून बाहेरच्या व्यापाऱ्यांना व कसबी लोकांना आणून शहरांतून त्यांची वस्ती करण्याचा प्रघात होता. पण अशी मंडळी लवकरच त्या त्या प्रांतांत स्थायिक होत, तेथील भाषा शिकत, त्या त्या समाजात लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करीत. इंग्रजांच्या अंमलाखाली ही परिस्थिती बदलली. इंग्रजी पोलीस सर्व प्रांतांतून सारखेच संरक्षण देत व ते संरक्षण पोषक समाजाच्या चांगुलपणावर, व्यापारी व जनता याच्या परस्परसंबंधांवर अवलंबून नव्हते. आपली मायभूमी सोडावी, परप्रांतांतून अलोट संपत्ती आणावी किंवा परप्रांती नोकरी करून द्रव्यसंचय करावा व आणलेल्या पैशातून स्वकीयांची व स्वकुटुंबाची भर करावी असा प्रघात सुरू झाला. परप्रांताबद्दल कधी आत्मीयता उत्पन्न झाली नाही-कधी त्या प्रांतातील लोकांच्या आकांक्षांबद्दल सहानुभूती वाटली नाही- पोटासाठी तसल्या सहानुभूतीचा वरवर देखावा करणेही आवश्यक राहिले नाही. प्रांताभिमानाच्या सीमेपलीकडे जाऊन अखिल भारताच्या प्रेमाचे दिग्दर्शन करणाऱ्यांत ह्या दोन तऱ्हेच्या लोकांचा विशेष भरणा दिसतो. ते आपली मायभाषा, प्रांत व जात कधी विसरत नाहीत. त्यांचा बेटीव्यवहार फक्त स्वप्रांतीयांतच होतो. इतर प्रांतांत ते आपापल्या प्रांतीयांचे भिन्न गट निर्माण करून कोठे महाराष्ट्रीय समाज, तर कोठे मारवाडी समाज, आंध्रसभा, तामीळसमिती, आदिकरून स्थापून इतरांपासूनचे आपल भिन्नत्व कायम ठेवतात. त्यांचा कटाक्ष एवढाच असतो की, नोकरीपुरता किंवा व्यापारधंदा करून पैसा मिळविण्यापुरता भारत एक आहे व तो मर्दाना तसा मोकळा राहावा. इंग्रजांचे स्वत:चे परकीयत्व, सर्व प्रांताबद्दल त्यांची समष्टी, कोठेही बदल्या केल्या तरी चालेल अशा तऱ्हेचा नोकरवर्ग निर्माण करण्याची आवश्यकता व सर्वत्र सारखेच संरक्षण ह्यामुळे ह्या नव्या वर्गाची उत्पत्ती व भरभराट झाली. आज ह्या दोन्ही वर्गाचा प्रभाव भारताच्या राजकारणावर पडलेला दिसतच आहे.
आमच्या कुटुंबसंस्थेत इंग्रजांनी प्रत्यक्ष ढवळाढवळ फार थोडी