पान:आमची संस्कृती.pdf/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८२ / आमची संस्कृती

उद्देशून अशा त-हेने बोलण्याची कोणा मालकाची छाती नाही. शिक्षकाबद्दल मात्र कोणीही काहीही बोलले तरी चालते. पालकांपैकी कोणी गरीब म्हणून, कोणी पैसेवाले म्हणून, कोणी अधिकारी म्हणून, कोणी विधानसभेचे मेंबर म्हणून सारखे दडपण येते. पुरेसे मार्क मिळाले नाहीत तरी पास करा, टर्म भरली नाही तरी भरल्याचे सर्टिफिकेट द्या, पुरेसे मार्क नाहीत तरी सायन्सकडे घ्या, रेसिडेन्सीत जागा द्या, एक ना दोन- ह्या धमकीवजा प्रार्थना ऐकून ऐकून शेवटी असेच वाटते की, आयुष्यभर विद्यार्थिजीवन व कॉलेजजीवन ह्यांत अभ्यासाची, सदाचरणाची व विवेकाची एक विशिष्ट मर्यादा राखण्यासाठी केलेली खटपट व्यर्थ आहे. काहीकाही विद्यार्थी व आईबाप ह्यांच्या अमर्याद आकांक्षा व त्याचबरोबर नैतिक मूल्यांचा संपूर्ण अभाव ह्यांच्यातून वाट काढायची कशी?

- १९५७