पान:आमची संस्कृती.pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / १८१

केमिस्ट्रीत त्याला शंभर मार्क मिळावयाचे. पण एवढे मार्क्स देणे म्हणजे स्वत:चा अपमान स्वत:च्या हाताने करून घेणे होय, ह्या कल्पनेने प्रोफेसरमहाशय त्याला ४-५ मार्क कमीच देत!' मेकॅनिक्सच्या पीरियडला केवळ सरांची गंमत करण्यासाठीच तो वर्गात असे, इतकेच!’ त्याला लॅंग्वेजेस इतक्या सुंदर येत की, तो आर्टसचा विद्यार्थी आहे असे वाटावे’ सर्व लेख अचाट आहे, पण सर्वांवर कळस पुढील वाक्यांत आहे. प्रॅक्टिकल्स सोडून त्याला कॉलेजात येण्याची फारशी जरुरी पडत नसे. मागच्या वर्षभर त्याचा रोलकॉल त्याचा पार्टनर देत होता व ह्या वर्षीही तेच चालू होते. त्याला खेळताही उत्तम येत होते. कॉलेज अगदी हरण्याच्या बेतात असताना त्याने कसलीही पर्वा न करता भराभर चार-सहाचे टोले मारून कॉलेजला विजयश्री मिळवून दिली!'

 ज्ञानयोग की जादू-जुगार योग?
 जगात कोणत्याही गोष्टीत काही कार्यकारणसंबंध आहे हे ह्या लेखक-विद्यार्थ्यांच्या गावीही नाही. विद्यार्थी म्हणून काही कर्तव्ये आहेत ह्याचा विचारसुद्धा मनात येत नाही. कसलीही पर्वा न करता हाताचे पट्टे फिरवून धावा काढता येतात ही त्यांची कल्पना. कोठचीही सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी ध्यान, मनन, सतत प्रयत्न व अभ्यास पाहिजे म्हणून पिढ्यान पिढ्यांच्या गुरुजनांनी सांगितलेले ह्यांच्या कानांवरून गेलेलेच नाही. ह्यांना ज्ञानयोग माहीत नाही, कर्मयोग माहीत नाही. जादू व जुगार योग तेवढे माहीत असावेत असे वाटते. अभ्यास न करता पास व्हावे, नापास झाले तरी दया व्हावी, कॉपी केली तरी शिक्षा होऊ नये, पेपर कठीण येता कामा नये, नेहमीपेक्षा त्याचे वळण निराळे असता कामा नये, अशा ह्यांच्या आकांक्षा! गोष्टींतून, लेखांतून व पत्रांतून गुरुजनांबद्दल काढलेले उदगार इतके हीन व असंस्कृत असतात की वाचताना उद्वेग येतो. नुकतेच एक निनावी पत्र पाहिले, त्यात वसतिगृहातील गैरव्यवस्थेबद्दल तक्रार होती. तक्रार रास्त होती की नाही हा प्रश्न निराळा, पण ती मांडण्याची पद्धत विशेषच उद्दाम व चारित्र्यहीन वाटली. रेक्टरांबद्दल (हे सर्व कॉलेजात शिक्षक असतात) 'निर्लज्ज, बेजाबदार' वगैरे विशेषणे ओळीओळीगणिक विखुरलेली. गड्याला किंवा कारखान्यातील मजुराला