पान:आमची संस्कृती.pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १७९

मुलगा पास होऊन जाईल. तरी जीव सुचित नव्हताच. संध्याकाळी रिझल्ट कळला, त्यात समजले की मुलगा तीन प्रमुख विषयांत अगदी वाईट मार्क मिळून नापास झाला आहे. जरी वाईट वाटले तरी मनात असे आले की, सर्व विषयांत उत्तम पास होणार वगैरे सर्व फसवणूक होती, हे बहिणीच्या ध्यानात येईल व ती भावाची कानउघाडणी करील, अनुभव मात्र अगदी वेगळाच आला. बहिणीला रिझल्ट कळवला तर ती म्हणे की, तुमच्या परीक्षकांनी पेपर नीट तपासले नाहीत. माझा भाऊ एका विषयांखेरीज सर्वात पास- म्हणजे उत्तम पास झाला असला पाहिजे अशी त्याची खात्री आहे! तिला त्या मुलाच्या वर्षांतील परीक्षांचे रिझल्ट काढून दाखवले तरी तिचे म्हणणे कायमच! भाऊ उनाडला किंवा त्याला विषय कळलेच नाहीत; आपल्याला प्रश्न नीट सोडवता आले नाहीत हे त्याला कळले तरी नाही किंवा कळूनही त्याने सर्व कुटुंबांची वंचना केली- ह्यांपैकी कोठल्याच निष्कर्षापर्यंत पोचायला तिचे मन तयार नव्हते. मुलाचे पेपर घरी आणून ते तपासूनही पाहिले- अर्थात तिला न कळवता. त्यांत परीक्षकांचे मार्क देणे योग्यच दिसले. कारण, नापास झालेल्या विषयांचे मुलाला काहीच ज्ञान नाही असे दिसून आले, असल्या प्रकरणांतून मनस्ताप होतो तो नुसत्या कटकटीमुळे नाही. अशा घटनांमुळे कर्तव्यशून्यता, आत्मवंचना, सदसदविवेकबुद्धीचा संपूर्ण अभाव इत्यादींचा जो आविष्कार होते त्यामुळे.

 विसंगत महत्त्वाकांक्षा
 मुलाच्या बुद्धीचे अचून निदान करणारे आईबाप अपवाद म्हणूनसुद्धा आढळणे कठीण. अशा बिचा-यांची महत्त्वाकांक्षा पाहून जीव दडपतो. मॅट्रिकमध्ये जेमतेम ४० टक्के मार्क मिळालेला प्रत्येक मुलगा नुसते कॉलेजात जायची इच्छा धरतो असे नाही, तर इंजिनियर व डॉक्टर होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असते. ह्या दोन्ही विषयांच्या कॉलेजांतर पहिल्या वर्गात आलेली किंवा खूप वर दुस-या वर्गात आलेली मुले आहेत, त्यांचे मॅट्रिकचे व पहिल्या वर्षांचे मार्कही उत्तमच असतात. पण मुलाची बुद्धी मापायचे हे ठोकळ प्रमाण आईबापांना मुळीच पटत नाही. त्यांच्या अंत:करणप्रवृत्ती त्यांना सांगतात की, 'मुलगा बुद्धिवान आहे.