पान:आमची संस्कृती.pdf/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८०/ आमची संस्कृती

कमी मार्क मिळाले ह्याला कारणे आजार, परीक्षकांची चूक, आयत्या वेळी घाबरणे अशी कितीतरी आहेत. काही गरीब आईबाप आपले खेड्यांतील बिऱ्हाड मोडून, शेती सोडून, मुलाला पुढे इंजिनियर किंवा डॉक्टर करायचे म्हणून पुण्यात येऊन बसतात. ही माणसे मुलगा पहिल्या वर्षात नापास झाला किंवा इंटर सायन्समध्ये त्याला फॉर्म मिळाला नाही की धाय मोकलून रडतात- मुलाच्या वतीने रदबदली करतात. ते ऐकून व दरवर्षी परत परत पाहूनही मनाला भयंकर वदना होतात.
 एक म्हातारे गृहस्थ मुलाला सायन्सला घ्या म्हणून सांगायला आले होते. हे स्वत: एका हायस्कुलात मास्तर होते. मुलाचे वय १९ की २०. जेमतेम शेकडा ३४/३५ टक्के मार्क मिळवलेले. मुलगा एवढ्या मोठेपणी कसा मॅट्रिक झाला म्हणून विचारले, तर गृहस्थांनी सांगितले, ‘की नववी दहावी व अकरावी ह्या तिन्ही वर्षात मुलगा एकएकदा नापास झाला. आता मॅट्रिक झाला आहे. इंटर सायन्स होऊन इंजिनिअरींगच्या परीक्षेकडे पाठवणार आहे.’ बिचारा मुलगा स्तब्ध उभा होता. बापाच्या महत्त्वाकांक्षेचा की वेड्या प्रेमाचा तो बळी! त्याची किंवा त्याच्या बापाची आम्हांला समजूत घालता आली नाही. म्हाताऱ्याचे पाण्याने डबडबलेले डोळे आठवले की कीव येते, पण त्याहीपेक्षा राग येतो. मुलाच्या नावापुढे पदवीची अक्षरे लागावीत म्हणून दुसऱ्या एकाने जिवाचे रान केले व मुलाच्या जन्माचे वाटोळे केले. बाप मेला. पण मुलगा जिवंतपणी रोज मरत आहे; ‘आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे!' पण आकांक्षा म्हणजे काही जेट विमाने नव्हेत, की मनात आले म्हणजे क्षणात पृथ्वीच्या कक्षेपलीकडे उडता येईल, गगनाला हात पोचवायचे तर प्रयत्नांचे पहाड रचावयास नकोत का? काही ध्येय डोळ्यांपुढे ठेवून सतत निरलस उद्योग करणे, आत्मपरीक्षण प्रांजलपणे करणे, ह्याऐवजी स्वप्नरंजन , आत्मवंचना व सतत स्वत:ची कीव करीत बसणे एवढे दिसते. मुलांच्या लिखाणातून काही काही वेळा हे स्वप्नरंजन फारच उत्तम तऱ्हेने प्रत्ययास येते. फर्ग्युसन कॉलेजच्या नियतकालिकाच्या मार्च १९५५ च्या अंकात ‘स्कॉलर' म्हणून एक गोष्ट कोणी विद्यार्थ्याने लिहिली आहे. त्यांतला नायक सर्व विषयात शंभर मार्क मिळवी. 'विजेच्या दिव्याचे बटन दाबल्यावर दिवा लागेल एवढ्या वेळात तो इलेक्ट्रिसिटीवरील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देई.'