पान:आमची संस्कृती.pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०४ / आमची संस्कृती

एकच हिंदू कायदा करणे शक्य व रास्त आहे काय? सध्या होऊ घातलेल्या कायद्याची कलमे वरवर वाचली तरी असे आढळून येईल की, सर्व हिंदूंना एकच कायदा करणे ही गोष्ट जवळजवळ अशक्य आहे व असा अट्टाहास धरलाच तर हिंदु समाजाच्या ब-याच मोठ्या विभागाचे परंपरागत व सर्वस्वी रास्त असे आचार त्यामुळे बेकायदा ठरून त्या विभागाला मोठा अन्याय होणार आहे. काही ठिकाणी रास्त असूनही व जुनी रूढी मोडत असतानाही लोकमताच्या (त्यांतूनही पुराणमतवाद्यांच्या भीतीने कायद्यात सुधारणा न करता तो अत्यंत प्रतिगामी स्वरूपाचा बनलेला आहे. उदाहरणार्थ, विवाह कोणाशी करावा ह्या प्रकरणात मुख्यत्वेकरून सापिण्ड्याचा विचार केला आहे व त्याप्रीत्यर्थ जे कोष्टक मांडले आहे त्याप्रमाणे झालेली लग्ने तेवढीच कायदेशीर असे म्हटले तर नर्मदेच्या दक्षिणेकडे होणारे आते-मामे भावंडांचे विवाह सर्वच बेकायदा ठरतील. त्याचप्रमाणे गुजरात-काठेवाड येथेही ब-याच जमातींतून अशी लग्ने होतात. ती तशी बेकायदा होऊ नये म्हणून ‘ज्या जमातीत अशी लग्ने करावयाची परंपरा आहे त्या जमातीला अपवाद म्हणून अशी लग्ने करावयाची परवानगी असावी.' असे कलम घातले आहे. विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडच्या सबंध प्रदेशात व काठेवाड, गुजरात व रजपुताना येथील काही जमाती एवढ्या हिंदुस्थानातील निम्या भूविभागाची जी रीत, तिला 'अपवाद' म्हणून मान्यता देणे ही गोष्ट रास्त नाही. सर्व हिंदूना म्हणून एक कायदा करून मग निम्या हिंदूना त्यांतून अपवाद म्हणून वगळण म्हणजे सर्व हिंदूना एकच कायदा आहे असा निव्वळ आभास उत्पन्न करणआहे. ह्या आभासमय एकीकरणापेक्षा हिंदूचे आचारभेद मान्य करून ते तुल्यबळ आहेत हे लक्षात घ्यावे व एक रूढी दुस-या रूढीचा अपवाद म्हणून न सांगता दोन्हीही समानत्वाने सांगाव्या हे ऐतिहासिक सत्याला धरून होईल.
 कृष्णेच्या दक्षिणेला व क्वचित गोदावरीपर्यंत तेलंगण, कर्नाटक, तामीळनाड आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जातींत मामा-भाचीचे लग्न होते. अशी लग्ने वरील कायद्याने सर्वस्वी निषिद्ध मानून ती बेकायदा ठरविली आहेत. अशी लग्ने बेकायदा ठरविण्याचे कारण ती समितीच्या सभासदांच्या दृष्टीने नीतिबाह्य आहेत, असे असावेसे वाटते. अशी लग्न आज हजारोंनी होत आहेत. सामाजिक आचारविचारांतील नीतीच्या कल्पना ह्या सर्वस्वी रूढीवर उभारलेल्या असतात. दोन भावांच्या मुलाचा