पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चहा प्यायला थांबलो तर, आत ही. आम्हाला पाहून जी आत गेली ती बाहेरच आली नाही. ती कारखान्यावरची बाई, मागं पोलिसांनी हाकलली नव्हती का ? तिनंच मांजरसुंब्यान ढाबा खोलला आहे. दैवाबी तिथच रहाते जनु ..... जाऊ द्या. ज्याचं नशीब त्याच्या बरुबर." असं म्हणत ड्रायव्हरने उसासा टाकला नि तो कामाला लागला.

 दैवाला मानसोपचार तज्ज्ञाला दाखविण्याचे आम्ही ठरवले होते. एका प्रकरणाच्या बाबतीत आम्ही त्या मुलीच्या पालकांना नांदेडच्या मानसोपचार तज्ञांकडे पाठवले होते आणि त्यांच्या उपचारांचा योग्य परिणामही झाला. ती मुलगी परत नवऱ्याकडे नांदण्यास गेली नाही. तशी अपेक्षा नव्हती. पण तिने स्वत:च्या चिमुकल्या मुलीवर राग काढू नये, तिला सतत मारू नये आणि स्वत: काही उद्योग करावा ही पालकांची इच्छा होती. दोन वर्षाची असताना संस्थेत दाखल झालेली ती छबकडी आता पाचवीत शिकते आहे. तिची आई छोटेसे दुकान चालवते. भावाच्या व आईच्या मदतीने स्वतंत्रपणे प्रपंच चालवते. दैवाने आम्हाला संधीच दिली नाही. जर तिलाही अशा तऱ्हेचे उपचार मिलाले असते तर कदाचित ती अशा तऱ्हेच्या व्यवसायात अडकली नसती. पण असेही मनात येतं, स्त्रियांनाही शारीरिक स्तरावरील इच्छा आकांक्षा असतात. तरुण वयात त्या बळावतात. त्यातून समागम सुखाचा अनुभव घेतलेल्या तरुण परित्यक्तांना शारीरिक भावनांतून होणारी गुदमर अधिक त्रासदायक होते. मनस्विनीसारख्या संस्था आर्थिक पुनर्वसन सहजतेने करु शकतात. पण अशा स्त्रियांचे भावनिक पुनर्वसन कसे करायचे? हा प्रश्न नेहमीच अस्वस्थ करतो. आणि या प्रश्नाविषयी खुलेपणानी बोलणे संस्थेच्या दृष्टीने धोक्याचे आणि गैरसोयीचे वाटते. ग्रामीण परिसरात परित्यक्ता स्त्रियांसाठी काम करणे ही जणू एक परीक्षाच. दाटलेली संध्याकाळ. भणाणणारे वारे. दिवली पदराआड झाकून पल्याड न्यायची आहे. दिवली विझता कामा नाही नि पदरही जळता कामा नाही.

 ही एक दैवा आम्हाला माहीत झाली म्हणून ! अशा हजारो, 'दैवा' घर ... आपलं घर शोधताहेत ! त्यांना मिळेल का घर ? की रस्त्या .. रस्त्यावरचे ढाबे ..., चहाची दुकाने ..., हॉटेलंच त्यांनी सजवायची ? त्यांचे दैव कुणाच्या हाती?

आपले आभाळ पेलताना/८४