पान:आपले आभाळ पेलताना.pdf/६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
गीताईचे भागवत ....


 "मी मायच्या पोटात होते तवा अण्णांच्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी घरी भागवत बसवलं होतं. मी पाचवी लेक. पोरग झालं तर भागवत नाव ठिवणार होते. पण समाप्तीच्या दिवशीच मायीनं घाई केली नि मी झाले. पुन्हा पोरगीच! पन पोथी वाचाणारा बामण बरा असावा. त्याने समजूत घातली म्हणे. की पांच लेकींचं कन्यादान केलं की स्वर्गातली सीट पक्की होते. देवांनीच पाचवी लेक धाडलीय. गीता नाव ठेवा असंही सांगितलं. म्हणून हे असं सुंदर नाव मिळालं. पण म्हणतात नां ? नाव सोनाबाई आणि हाती कथलाचा वाा नाही. नांव गीता पन अख्खा जन्म रडगाणी गाण्यात चाललाया." गीता बोलायला लागली की किती बोलू नि किती नको असे होऊन जाई. लहानपणापासून बोलण्यावर नेहमीच 'अळीमिळी गुपचिळी' चा कायदा होता. एकतर ही पाचवी. त्यातून रीतीरिवाजांच्या घडीबंद घरातली लेक, वडिलांना पंधरा एकर रान होतं. दोन विहिरी होत्या. पण पदरातल्या पाच पोरींचा उताडा घराबाहेर काढायचा ही काय चुटकी वाजवण्यासारखी सोपी बाब होती?

 "भाभी, आजकाल चपराशाची नोकरी मिळवायसाठी तीस-तीस हजार मोजावे लागतात. नोकरीवाला नवरा शोधायचा तर लाखाची तयारी हवी. ती कशी आमच्या आण्णांना पेलणार ? मोठे दाजी आक्कीपरीस चौदा वरसांनी वडील आहेत. त्याची पहिली बायकू तिसऱ्या बाळातपणात खर्चली. तिच्यावर आक्कीला दिली. रुपया नि नारळावर लग्न लागलं. दाजींचा वारदाना मोठ्ठा पन्नास एकरात तर नुसती बागायत. आक्की पहिलीची तीन नि स्वत:ची चार अशा सात लेकरांना वाढवतेय. तिसरी माया लईच देखणी होती. म्हणून शेजारगावच्या हायस्कुलातील चपराशाने मागून केली. आक्कीनंतरची शांतू लई कामसू नि गरीब होती. तिला कुंबेफळात दिली होती. नवरा टेलर काम करायचा.अण्णांनी दोन एकराचा तुकडा इकून लगीन करुन दिलं. वरीसभर सुद्धा नांदली नाही. पंचमीला पहिल्यांदा माहेरपणाला आली तेव्हा खूप घुसमटल्यागत वाटली. डोळे नेहमीच भरून वाहात. आमच्या धाकट्या काकीने खोदून-खोदून इचारलं. पन तिनं काहीच थांगपता लागू दिला न्हाई. आणि नवरात्रीच्या तिसऱ्या माळंलाच तिच्या गावाकडून निरोप आला की सकाळी पानी भरतांना हिरीत पाय घसरुन पडली नि तिथंच म्येली. अण्णा नि आई फकस्त मातीला पोचले. माय एक दिवस आक्कीला सांगत होती की,

आपले आभाळ पेलताना/६७