पान:आधुनिक आहारशास्त्र.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आहारशास्त्राची अवश्यकता

 आहारशास्त्र हा शब्द ऐकल्याबरोबर कोणाच्याही मनांत सहज कल्पना येईल कीं प्रत्येक प्राणि जी गोष्ट निसर्गतः जन्मापासून करीत असतो, त्याला शास्त्राची जरूर काय ? अशाच प्रकारचा प्रश्न कामशास्त्राचे बाबतींतही उपस्थित होतो, आणि त्याचें जें उत्तर तज्ञांनी दिलेले आहे, तेंच येथेंही देणें भाग आहे. मात्र कामशास्त्राचे बाबतीत मनुष्य जितका निसर्गाला चिकटून राहिलेला आहे, तितका आहाराचे बाबतींत राहिलेला नाहीं. तो आपल्या अकलेने, किंवा बेअकली- पणाने, निसर्गापासून इतका लांब वहात गेलेला आहे, की आतां त्याला आहार- शास्त्र तयार केल्यावांचून गत्यंतर नाही. यांत एक गोष्ट कोणाच्याही लक्षांत येण्यासारखी आहे, की उत्क्रांतितत्वाप्रमाणे खालच्या प्राण्यांपासून मनुष्याची उत्पत्ति होतांना त्याची अक्कल जसजशी वाढत गेली, तसतशा त्याच्या उपजत प्रेरणा कमी होत गेल्या. या संबंधाने एका शास्त्रज्ञाने पुढील प्रयोग करून पाहिला. मनुष्याच्या खालचा पण मनुष्याला सर्वांत जवळचा प्राणि जो बिनशेपटीचा बानर ( यांत चार जाती आहेत ), त्याचें एक पिल्लं, आणि अकलेने वानराच्या खालोखाल जे दोन प्राणि समजलेले आहेत, म्हणजे एक कुत्रा आणि दुसरें जल- बिडाल किंवा पाणमांजर ( याचें इंग्रजी नांव ' ऑटर' हें कदाचित् कांहींच्या जास्त परिचयाचे असेल ), त्यांपैकी पाणमांजराचें एक पिल्लू, अशीं दोन पिल्लें त्याने लहानपणापासून पाळली आणि दोहोंनाही नैसर्गिक आहार न देतां आपल्या घरचें नेहमीचें अन्न घातलें. अशा तऱ्हेने त्यांना कांहीं वर्षे वाढवल्यानंतर त्यानें पाणमांजराला दोन दिवस उपाशीं ठेऊन मग त्याला नैसर्गिक स्थितींत नेऊन सोडलें. हा प्राणि मूळचा पाण्याजवळ राहून मधून- मधून पाण्यांत बुडी मारून मासे पकडून खाणारा आहे, आणि तो जवळ-