पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विज्ञानाचे जीवन जगणे. कोणताही खरा देव वा धर्म शिकवत नाही. विषमता निर्माण करत नाही हे लक्षात आले की स्त्रीला मशिदीत असो वा मंदिराच्या गाभा-यात असो प्रवेश नसणं म्हणजे स्त्रीचं ‘माणूसपण' नाकारणं हे कळायला वेळ लागत नाही.
 खरेदीला पाडवा, अक्षयतृतीया, गुरूपुष्पामृत योग कशाला हवा? पैसे असली, गरज असली की खरेदी करायची. खडे लाभतात, बाधतात हे तर शुद्ध थोतांड आहे. ज्योतिष ही त्यातलीच गोष्ट. परवा मी एक बातमी वाचली. सर्व पंचागकर्त एकत्र येऊन त्यांनी मुहूर्त, तिथितील विसंगती दूर करून एकच तिथि, सण, मुहर्त करायचा निर्णय घेतला. यात विज्ञानाकडे जाण्याचा कल आहे. कालचक्र शास्त्र आहे. ते अक्षांश, रेखांश, पृथ्वी परिक्रमा, चंद्रोदय, सूर्यास्त या वैज्ञानिक तथ्यावर ते आधारित असायला पाहिजे. विसंगती म्हणजे शंकेस वाव हे विज्ञान सत्य त्यांना गवसले. चोरी झाली की पूर्वी लोक ब्राह्मणाकडे जात. तो दिशा सूचवायचा. संकेत द्यायचा. आता लोक पोलिसात जातात. पोलीस श्वानपथक घेऊन येते. स्पर्शाचा वास, ठसे, डी.एन.ए. यातून शोधशास्त्र विकसित झालं व ज्योतिषशास्त्र मागे पडलं.

 या जगात इष्ट घडले ते सदाचारानी, अनिष्ट जन्मत ते दुराचारानी. हे आजच्या काळात शिकलेल्या माणसाला कळू लागलं आहे. तरी देवळातली गर्दी कमी होत नाही? मशिद, चर्च अजूनही आपल्या समाजात मूळ धरून आहे याचं कारण जीवनातले सर्व व्यवहार का? कसे? या विवेक बुद्धी व तर्क निकषांवर आपण पारखून पहात नाही म्हणून. मानसिक दुर्बलता माणसास बयाचदा अगतिक करते. अगतिकता अंधश्रद्धेस जन्म देते. म्हणून माणसानी रोजचे व्यवहार विवेक, विज्ञान, बुद्धी, तर्क, व्यवहार्यता इत्यादी कसोट्यांवर करायची जीवन शैली विकसित केली पाहिजे. हा विचार हिच नव्या विचाराची गुढी होय. झोका ऊंचच का? गुढी ऊंचच का? कारण ते आपल्या उन्नती व उत्कर्षाचे परमबिंदू होत. नव विचार हा देखील विकासाचा परमबिंदू होय. तो विज्ञान व विवेकानीच गाढता येतो. सर्व अंधश्रद्धांचे निर्मूलन म्हणजेच निर्मल समाज निर्मिती होय.

आकाश संवाद/९४