पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विवेक व विज्ञानाची गुढी ऊंच करूया

 एकविसावे शतक हे विज्ञानाचे, तसेच ते विवेकाचेही आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट माणसानी तर्क, बुद्धी व व्यवहार्यतेच्या कसोटीवर पारखून घ्यायला हवी. पूर्वी मनुष्य अडाणी होता. तो अनुभवानी शहाणा झाला. त्याच्या शहाणपणानी त्याला दोन गोष्टी शिकवल्या. त्या म्हणजे योग्य काय? नि अयोग्य काय? जे हिताचं ते योग्य, अहिताचं ते अयोग्य. माणूस चांगला व्हावा म्हणून त्याने समाजात धर्म, नीती, देव, भूत, प्रत इत्यादी कल्पनांनी निर्मिती केली. या सर्व कल्पनाच आहेत हे एकदा तुम्हाला कळालं की त्याची भीती जाते, व्यर्थपणाही लक्षात येतो.
 पूर्वी पाऊस पडला नाही की माणूस देवांना पाण्यात बुडवून ठेवायचा. आज कोणी असे करत नाही. कारण पाऊस प्रार्थनेनी नाही तर निसर्ग बदलानी पडतो हे त्याला विज्ञानानी समजावले. तसेच मूल-बाळ होण्याचं. कुणा बुवा, भटजीकडे जावून, व्रत वैकल्ये करुन न होणारं मूल जन्मत नाही. मूल व्हायचे तर स्त्री पुरुष संबंध हवा. तो कृत्रिम रेतनानी पण होतो हे माणसाला कळून चुकलं. मांजर आडवे गेले म्हणून शकून अपशकून मानणारा काळ मागे पडला. ८0 किलो मिटरच्या गतीत मला रोज मरणारी (आडवी जाणारी!) मांजरे दिसतात. पूर्वी अशी ती मरत नसेत. मांजर मेले म्हणून प्रायश्चित घ्यायला काशीला जायचा काळ संपला.

 असे भरपूर छोटे छोटे बदल होऊन जीवनातील अंधश्रद्धा कमी झाल्या, मोडीत निघाल्या हे जरी खरे असले तरी काही नव्या अंधश्रद्धा मतलबी लोग नव्याने रूजवू पहात आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे आनंदी वस्तू. तुळस इथं लावा, माठ इथं ठेवा, प्रवेश करा म्हणून सांगणारे नवे अंधश्रद्धा प्रचारक होत. त्यांच्या भूलथापांना, बळी पडता नये. अंगात येणे, देव धुपारे करणे, भानामती हे सर्रास दिसून येणारे प्रसंग केवळ अज्ञान व अकारण भयातून निर्माण होतात. बुध्दीच्या कसोटीवर अनुभवजन्य नाही ते नाकारणे म्हणजे विवेकाचं,

आकाश संवाद/९३