पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'जहाँ दया तहाँ धर्म है, जहाँ छिमा तहाँ आप’'सारख्या वचनातून कबीरांनी दया, क्षमा, शांतीचा संदेश दिला आहे. ब-याचदा माणसे खूप बोलत राहतात. करत काहीच नाही. असे बोलणे ते निरर्थक मानायचे. जी वाचाळता तुमचं स्वतःचे हृदय भेदू शकत नाही ती काय कामाची असा प्रतिप्रश्न करून कबीरांनी विचार युक्त आचाराचा महिमाच स्पष्ट केला आहे.
 आचार सब जग मिला, मिला विचारी न कोय' म्हणून कबीरांनी समाजाची वैचारिक दिवाळखोरीच वेशीवर टांगली आहे. विवेकशील जीवन हेच माणसास अन्य प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवत असते आणि म्हणून माणसाने विवेक जाणीवपूर्वक जोपासला पाहिजे, असे कबीर अनेकदा बजावतात.
 कबीरांनी आपल्या समग्र काव्यातून मानव जीवन अधिक समृद्ध, शुद्ध व्हावे म्हणून प्रयत्न केला. देव, धर्माची नवी व्याख्या समाजापुढे मांडून आचरण शुद्धता म्हणजेच धर्म असे आग्रही प्रतिपादन केले. कबीरांनी आपल्या काव्यातून स्पष्ट केलेला आचारधर्मच समाजास तारू शकेल असे वाटते. कबीरांचे संत माहात्म्य हे त्यांच्यातील भक्तापेक्षा समाजसुधारक व मानव उद्धारकात सामावलेलं आहे.

 कबीरा सोई पीर है, जो जाने पर पीर' म्हणणारे कबीर समाजातील सर्व अमंगल, दुःख दूर करण्याचा ध्यास घेतलेले सुधारक म्हणून आपल्यापुढे येतात.

आकाश संवाद/८०