पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सणांमागील सामाजिक जाणीव

 भारत विभिन्नतेने नटलेला देश आहे. आपल्या देशांत विविध धर्म, जाती, भाषा, पंथ आहेत. आपल्या देशात या विभिन्नतेमुळे सण व उत्सवांना तोटा नाही. तीनशे पासष्ट दिवसात सण, उत्सव, व्रत, यात्रा, मुहूर्त नसलेला दिवस सापडणे दुर्मीळ. व्रत/वैकल्ये सांगणारी कॅलेंडरे पहा. रिकामा दिवस मिळणे कठीण. सणांची विपुलता आपल्या देशाचे सांस्कृतिक वैभव आहे. या वैभवामुळेच आपल्या देशात धार्मिक बंधुभाव व सहिष्णुता वाढीस लागली. आपल्या पूर्वजांनी केलेली सणांची योजना पाहिली की त्याच्या दूरदृष्टीचा नि विज्ञाननिष्ठेचा प्रत्यय येतो. मुळात सण, व्रत आणि वैकल्ये ही सामाजिक गरजेतून निर्माण झाली. बदलत्या काळात ती कर्मकांडे बनली हा भाग वेगळा.

 बकरी ईद सणच पहा ना. बकरी ईद या शब्दाचा अर्थच मुळी बलिदानाचा उत्सव! पूर्वी आपले मुसलमान बांधवही या वेळी उपवास करायचे. पुढे त्याचे रूपांतर सणात झाले. या दिवशी आपले सर्व मुसलमान बांधव शुचिर्भूत होऊन नवे कपडे परिधान करतात. ईदगाहवर जाऊन नमाज पढतात. नंतर सर्व जण गळामिठी घालून ईद मुबारक' म्हणून शुभेच्छा देतात. त्यानंतर दिल्या जाणा-या बळीचा एका हिस्सा ते गरिबांना वाटतात. वरकरणी आनंद उत्सवाचे प्रतीक असलेल्या या सणात फार मोठा सामाजिक आशय भरलेला तुम्हास दिसून येईल. स्वत:ची सुख दु:खे विसरून लोक जेव्हा प्रार्थनास्थळी येतात, तेव्हा ते स्वत्व विसरून एक होतात. दुस-याला शुभेच्छा देत आपल्यातील मांगल्य व उदारतेचे प्रदर्शन करतात. आपल्या घासातील घास गरिबांना वाटून ते त्यागमय जीवन जगतात. सर्व धर्मातील विविध सणात दडलेला सामाजिक आशय शोधून जर आपण त्याप्रमाणे वागू लागलो तर आपल्या सामाजिक जीवनास लागलेले निराशेचे ग्रहण सुटण्यास वेळ लाकणार नाही.

आकाश संवाद/८१