पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पडून असतानाही म्हणे आमच्या आश्रमाच्या मुलांच्या वॉर्डात रेडिओ सुरू असायचा. त्याची म्हणे आम्हाला इतकी सवय असायची की तो लागल्याशिवाय आम्ही झोपत नसू म्हणे. ती सवय आज वयाच्या ६७ व्या वर्षीही टिकून आहे. ‘शमा ए गझल' ऐकल्याशिवाय वा रजनीगंधा ऐकल्याशिवाय झोप येत नाही व मग डोळे किलकिले होऊ लागतात. 'मॉर्निग मंत्रा' वा 'भक्तिसंगीत कानावर पडावेच लागते. रेडिओ माझा एकांतपणाचा सोबती होय. मला एकटे राहायला, विचार करायला, वाचायला, रेडिओ ऐकायला मनस्वी आवडते. माझे एक न्यूरो सर्जन मित्र आहेत. त्यांना गुंतागुंतीचे ऑपरेशन करताना रेडिओ लागतो. ही काय किमया आहे रेडिओची? तर तो एक अंतर संवाद आहे. पण तो जुळून येण्यासाठी तुमच्यात एकतानता हवी व एकाग्रताही!
 अशा रेडिओवर मी लहानपणी भाषण ऐकत असे वा 'बालसखा' कार्यक्रम ऐकत असे. शालेय कार्यक्रम ऐकायचो तेव्हा आपलाही आवाज असा ऐकता यावा, भाषण करावे, नाटक करावे, आपली कुणीतरी मुलाखत घ्यावी असे वाटायचे... पण ते एक बाल स्वप्नरंजन होते. त्याला मूर्त स्वरूप आले ते १९८२ ला. त्याचे असे झाले, मी पीएच्. डी. होऊन कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो होतो. शिवाजी विद्यापीठात एम. ए. ला हिंदी शिकवत असे. मी ज्या महावीर कॉलेजमध्ये नोकरीस होतो तिथले प्रा. वैजनाथ महाजन हे मराठीचे प्राध्यापक नुकतेच सांगलीस गेले होते. सांगली आकाशवाणीचा एक कार्यक्रम कोल्हापूरला होता. त्याच वेळी केशवराव भोसले नाट्यगृहात ज्ञानपीठ विजेते साहित्यिक शिवराम कारंथ एका हिंदी नाटक विषयक इतिहास ग्रंथ प्रकाशनार्थ आलेले. तो कार्यक्रम ऐकण्यासाठी सांगली आकाशवाणीचे तत्कालीन संचालक हरिश्चंद्र जाधव उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अनौपचारिक गप्पात प्रा. वैजनाथ महाराज यांनी हरिश्चंद्र जाधव यांना माझ्या परिचय करून दिला आणि म्हणाले की, “तुम्हास वक्ता पाहिजे होता ना? हा घ्या. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा. साहित्य, समाज कोणताही विषय यांना द्या. ते चांगले भाषण करतील." त्या वेळी सांगली आकाशवाणीवरून ‘धर्म आणि एकात्मता' विषयावरील व्याख्यानमाला सुरू होती. हरिश्चंद्र जाधव म्हणाले, “तुम्ही ‘महानुभाव पंथ आणि एकात्मता' विषयावर भाषण लिहून पाठवा. आपण ते लावू.' आज मला चांगले आठवते की, मी हिंदीचा प्राध्यापक असल्याने मला महानुभाव