पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंग्रजी अनिवार्य नाही. मग आपण काय म्हणून इंग्रजीच्या कुबड्या बाळगतो आहोत? हा विचार करायची आता वेळ आली आहे. विदेशी भाषेची जी एक मानसिक गुलामगिरी आपल्या इथे आहे तिला आपण मुळापासून उपटून टाकली पाहिजे. फ्रान्स, जर्मन, चीन, रशियासारखे देश इंग्रजी शिवाय स्वतःला समृद्ध बनवू शकतात मग आपणच काय म्हणून तिच्यापाठी लागलो आहोत? भाषेची आध्यात्मिक समृद्धी आपणच आणू शकतो. हिंदीला मनापासून, राष्ट्रीय कर्तव्य मानून स्वीकारा आणि मग बघा, त्यासाठी कोणत्याही अध्यादेशाची आवश्यकताच राहणार नाही. कोणतीही लोकभाषा तेव्हाच राष्ट्रभाषा होऊ शकते जेव्हा बोलताना लोक तिचा वापर करू लागतात.
 राष्ट्रभाषा हिंदीला ख-या अर्थाने राष्ट्रभाषेचे पद बहाल करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आपल्या रोजच्या व्यवहाराच्या भाषेच्या रूपात आपण हिंदीचा वापर केला पाहिजे. आपले प्रत्येक सार्वजनिक समारंभ, उत्सव इत्यादींचे संचालन हिंदीत केले पाहिजे. आपले कार्यकर्ते, नगरपरिषदेचे सदस्य, आमदार, संसद सदस्य, मंत्री या सगळ्या सार्वजनिक कार्यकर्त्यांनी हिंदी बोलायला शिकले पाहिजे. हिंदीइतकी सोपी दुसरी कोणतीही भाषा नाही. आपले राष्ट्रीय प्रक्षेपण व प्रसारण हिंदीत झाले पाहिजे. आपल्या कार्यालयांची भाषा हिंदी झाली पाहिजे. आपल्या देशातील लोक जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून हिंदीचा वापर केला पाहिजे. अशा छोट्या छोट्या प्रयत्नांनीही हिंदीला ख-या अर्थाने राष्ट्रभाषा बनवू शकू.

 राष्ट्रपिता महात्मा गांधींनी भारताच्या सुराज्याचं जे स्वप्न पाहिले होते त्यात हिंदीचा समावेश होता. आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही ही गोष्ट नेहमी त्यांना खटकत होती. ते म्हणत असते, “राष्ट्रभाषा नसल्याने माझा देश मुका राहिला आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांनंतरसुद्धा आपण आपल्या देशाला राष्ट्रीय वाणी देऊ शकलेलो नाही. ही त्रुटी पूर्ण करण्यासाठी आता आपण प्रतिज्ञा केली पाहिजे की येणा-या १० वर्षांत आम्ही आपल्या राष्ट्रभाषेला इतकी आध्यात्मिक समृद्धी बहाल करू की ज्यामुळे स्वातंत्र्याची सुवर्ण जयंती आणि हिंदीत साजरी करू शकू. ती अशी सुवर्ण जयंती होईल ज्यात आसेतु हिमालय हिंदी आमचा श्वास असेल आणि प्राणसुद्धा! विभिन्नतेने नटलेल्या भारतवर्षाला एकतेच्या शृंखलेने बांधण्याचे सामर्थ्य असणा-या या भाषेच्या विकासाच्या संदर्भात आपल्याला पाहिलं पाहिजे की राजनैतिक स्वार्थासाठी कोणी याचा गैरफायदा तर उठवत नाहीत. आपण सगळ्यांनी मिळून आज एक प्रतिज्ञा करू या की हिंदी माझी जननी असेल, वाचा असेल, जीवन असेल आणि प्राणसुद्धा!

आकाश संवाद/६२