पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नशेने वेडा झालेला मंगल पांडे बंदूक घेऊन इंग्रजांशी दोन हात करण्याचे आवाहन करू लागला. या धाडसाने संपूर्ण छावणी आश्चर्यचकित झाली. इंग्रजांना काहीच सुचेना. मारो फिरंगी को' अशी घोषणा करत एकटा मंगल पांडेच काय तो ओरडत राहिला. बाकी सगळे फक्त बघतच राहिले. त्या वेळी त्याच्या या असीम साहसाला इतर साथीदारांचे समर्थन मिळाले असते तर कदाचित देशाच्या स्वातंत्र्यासाठी शंभर वर्षे वाट पाहावी लागली नसती. पण नियतीला कदाचित हे मंजूर नसावे.

 मंगल पांडेने इंग्रज अधिकारी ह्यूसनला आपल्या गोळीचा शिकार बनविला. ह्यूसन धारातीर्थी पडला. इंग्रजी सत्तेचे पतन सुरू झाले. ह्यूसनला मरणासन्न अवस्थेत बघून इंग्रजांचे भडकून उठणे स्वाभाविक होते. लेफ्टनंट बकने मंगल पांडेला आव्हान केले. त्याला शरण येण्यास सांगितले. जीवदानाचे आश्वासनसुद्धा दिले. पण मंगल पांडे वचनासाठी मरणारा, तत्त्वांचा पक्का शिपाई होता. त्याच्यासाठी जीवदानाच्या भिकेपेक्षा आपल्या मातृभूमीची हाक महत्त्वाची होती. त्याने लेफ्टनंट बकलासुद्धा गोळीने उडविले. मंगल पांडेच्या या अचाट धाडसाने इंग्रज चिंतित झाले. पूर्ण पलटणींचा धाक दाखवून कर्नल व्हीलरने पुन्हा त्याला शरण यायचे आवाहन केले. परंतु मंगल पांडेवर देशाला स्वातंत्र करण्याची, त्याचप्रमाणे इंग्रजांचा कोणत्याही परिस्थितीत बदला घेण्याची भावना तीव्र झाली होती. त्यांच्या देशनिष्ठेने फलटणीतील हिंदुस्थानी शिपायांत देशप्रेमाची भावना जागृत झाली. त्यांनी इंग्रजांना परत फिरण्यास सांगितले. ते एका आवाजात गरजले. “खबरदार, जर मंगल पांडेला हात लावला तर. जो हात उचलेल त्याचे हात वेगळे केले जातील. त्यांच्या आम्ही केसालासुद्धा हात लावू देणार नाही." हे ऐकून कर्नल व्हीलर दोन पावले मागे वळला. त्याने मंगल पांडेला अटक करण्याची आज्ञा केली. पण कुणीही त्याचे ऐकले नाही. या पराजयानंतर आता पाळी होती, जनरल हियर्सची. इंग्रजी सैन्याच्या आणखी तुकड्या आणल्या गेल्या. पस्तिसाव्या पलटणीच्या सगळ्या हिंदुस्थानी सैनिकांना घेरले गेले तेव्हा कुठे मंगल पांडे त्यांच्या हाताला लागला. पण तोसुद्धा जखमी अवस्थेत असताना! अपमानित होऊन इंग्रजांचा कैदी होण्याच्या कल्पनेने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. जनरल हियर्सवर रोखलेली बंदूक त्याने आपल्याकडे वळविली आणि ट्रिगर दाबला. पाहता पाहता मंगल पांडे जमिनीवर पडला. रक्ताने माखलेला आणि बेशुद्ध मंगल मिळूनसुद्धा इंग्रज त्याला हात लावण्यास घाबरू लागले. भीती होती, जर पुन्हा उठला तर! सर्व इंग्रज आता त्याला घाबरू लागले होते. नंतर औषधपाणी देऊन त्याच्यावर उपचार केले जाऊ लागले.

आकाश संवाद/५१