पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बच्याच घरात आजी-आजोबांना नमस्कार करा म्हणून दरडावणारे आईवडील नमस्कार करताना मुलांना दिसत नाहीत. वडील माणसांची सेवा शुश्रूषा, हवं नको विचारणं यातून कितीतरी आपलेपणा निर्माण होत असतो. असे प्रसंग नव्या पिढीने कर्तव्यपूर्ती व संस्कार रुजवणीची संधी मानून स्वीकारायला हवे. नव्या पिढीच्या राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी भिन्न असणे गैर नाही. त्यात आपले स्वातंत्र्य उपभोगत असताना पूर्व पिढीच्या सवयींची जपणूक करण्याचे भान आपण ठेवायला हवे. नातेसंबंधांचा गतीने होणारा -हास हा आजच्या कौटुंबिक अस्वास्थ्याचा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या मुलांना आजी, आजोबा, काका, मामा, मावशी याची घरं आपल्या छोट्या छोट्या स्वार्थ आणि मतभेदांमुळे पारखी करतो आहोत याचे भान । ठेवायला हवे. प्रसंगी व्यक्तिगत मतांना मुरड घालून मुलांसाठी, आई-वडिलांसाठी हे सर्व जपायला हवं. कौटुंबिक स्वास्थ्य हे नेहमीच त्याग, समर्पण, आस्था, बंधुभाव, कर्तव्यपरायणता इत्यादींवर अवलंबून असते. नवमतवाद, स्वातंत्र्य, उपभोग वृत्ती यांच्या जोरावर आपण आपले कुटुंब ‘घर' करणारा का ‘लॉजिंग/ बोर्डिंग' हा खरा प्रश्न आहे. ज्या पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने आपण संयुक्त कुटुंबे नाकारून विभक्त झालो तेथील कुटुंब स्वास्थ्य हरवल्याने निर्माण झालेले मानवी संबंधाचे प्रश्न आपण डोळसपणे अभ्यासून आपल्यात बदल घडवून आणले पाहिजे. पिढीतील अंतर हे कुटुंब स्वास्थ्य हरवणारे कारण न होता कुटुंब स्वास्थ्य वाढवणारे वरदान व्हायला हवे. “हम दो हमारे दो'ची घोषणा नियोजनासंदर्भात योग्य असली तरी घरासंदर्भात ‘हम सब एक है' हाच आपला मूलमंत्र व्हायला हवा. तरच आपण हे विश्वचि माझे घर पर्यंतची मजल मारू शकू.

आकाश संवाद/४८