पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अवलंबून असते. मनात केवळ इच्छा निर्माण होणे पुरेसे असत नाही. इच्छाशक्तीच्या वापराची वृत्ती आपणात असायला हवी. असेल हरी तर देईल खाटल्यावरी' असा दैववाद एक प्रकारची अकर्मण्यताच असते. अशा दैववादी वृत्तीतून आळस, भय, निष्क्रियता, निराशा यासारखे दोष निर्माण होताता. म्हणून आपण मनामध्ये सतत वैध आणि विधायक अशा इच्छा कशा निर्माण होतील, हे पाहायला हवे. त्यानुसार आपण कृती करायला हवी. तीव्र इच्छा आणि पराकाष्ठेचे प्रयत्न यांचा संगम झाला की मग जीवन सार्थकी लागण्यास वेळ लागत नाही. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' म्हणण्यात हाच भाव आहे. शिवाजी महाराजांनी तीव्र इच्छेच्या बळावरच महाराष्ट्र धर्म रुजवला. आर्किमिडीजचं जीवनही हेच सांगते. इच्छेच्या बळावर असाध्य रोगातून उठलेली माणसे आपण पाहतो. बेचिराख जपानचे उदाहरण हे जाज्वल्य इच्छाशक्ती वापराचे अनुकरणीय उदाहरण होय! इस्त्रायलसारखा देश वाळूतून वेळू निर्माण करतो, देशाचे नंदनवन बनवतो, ते इच्छाशक्तीच्या वापरामुळेच ना?
 व्यक्तिगत जीवनाप्रमाणे आपला समाज, समुदाय, समूह जीवनाशीदेखील इच्छाशक्तीचा घनिष्ठ संबंध आहे. जगात कितीतरी जाती-जमातींच्या प्रगतीचा इतिहास एका अर्थाने त्यांच्या इच्छाशक्तीच्या वापराचे फलितच म्हणावे लागेल. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर गेल्या शतकातील स्वतंत्र झालेल्या देशांचे देता येईल. भारतही त्यापैकीच एक होय. महात्मा गांधींनी विविध चळवळीतून जनमानसात स्वातंत्र्याची इच्छा जागवली. जनतेस कृतीप्रवण केले. जनता पेटून उठली. यावत्चंद्र दिवाकरौ'ची दर्पोक्ती करणाच्या ब्रिटिशांना 'याचि देही याचि डोळा' युनियन जॅकचे अवरोहण पहावे लागले. नेल्सन मंडेलांनी दिलेला लढा हा इच्छाशक्ती वापराचा आणखी एक वस्तुपाठच ना? समाजात कधी काळी वेठबिगारी होती. दास म्हणून माणसास विकले जायचे. स्त्रीस केवळ भोग्य मानले जायचे. या सर्व पीडित समुदायात सर्वोदय घडून आला, तो त्यांच्या सामुदायिक इच्छाशक्तीच्या वापरामुळेच. व्यक्तीत काय किंवा समुदायात काय प्रथम इच्छाशक्ती जागावी लागते. कधी ती जागवावी सुद्धा लागते. पण एकदा का तिचं महत्त्व समजलं की मग काम फत्ते समजावं.

 अलीकडे मानसशास्त्र नि समाजशास्त्र समूहमनाचा मोठा अभ्यास करू लागलंय. या मानव्यशास्त्रांनी सगळ्या जडणघडणीमागे इच्छाशक्ती कार्यरत असल्याचे प्रयोगांती सिद्ध केलेय. समूहमनामध्ये सर्वाधिक शक्तिशाली इच्छा असते. त्या इच्छाशक्तीत हजारो बॉम्बची ताकद सामावलेली असते. त्या

आकाश संवाद/२६