पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मला याची कल्पना आहे की असे सुखी उत्तरायुष्य सान्यांच्या वाट्यास येत नाही. आलेले नाही. पण येऊ शकते, होऊ शकतं असा आशावाद मला हेतुतः जागवायचा आहे. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' असा ध्यास आपण सर्वांनी मनी-मानसी रुजवला तर हे अशक्य नक्कीच नाही. संध्याछाया एका अर्थाने मिटण्याचे पर्व. ज्यांना पुस्तक मिटण्याच्या सहजतेनं आयुष्य, जीवन मिटवता आले ते भाग्यवान खरेच. त्यांचे जीवन आपण तपासू लागलो की लक्षात येते त्यांच्या यशस्वितेचे सारे गमक त्यांच्या मनोवृत्तीत सामावलेलं असतं. माझ्या मित्राचे वडील गतवर्षीच निवर्तले. जीवनभर राजासारखे राहिले. उतारवयात कार्यरत राहिले. नव्वदावा वाढदिवस कृष्णछाया घेऊन आला. कॅन्सरचे निदान झाले. त्यांनी उपचार न करण्याचा निर्णय घेतला. पैसा, साधने सर्व असताना घरच्यांना त्रास नको म्हणून स्वेच्छा आहार नियंत्रित केला. काही दिवसातच ते झोपेत निवर्तले.

 संध्याछायेत स्वेच्छामरणाचे सुख मिळवणे हे योगीपण होय. ती असते कठोर जीवनसाधनेची फलश्रुती! असे जीवन जगता येणं म्हणजे संध्याछायेवर विजय मिळवणे. स्वत: सुखी राहू. दुस-यास सुखी करू. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामयः' हे सुभाषित हेच तर शिकवते!!

आकाश संवाद/२४