पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाणवून घेतले तर संध्याछाया छोट्या होतील, मृत्यूच्या आर्त प्रतीक्षेच्या जीवघेण्या यातनेतून ते स्वत:स मुक्त करू शकतील व भोवतालचं जगही ते सुखपूर्ण करू शकतील!
 पूर्वी संध्याछायेचे जीवन दयेचं जीवन होते. आता स्थिती पालटू लागली आहे, ती उभयपक्षी सामंजस्यामुळे. पूर्वी घरातील वडीलधा-यांना मिळकतीचा, मिळवलेल्याचा अहंकार असायचा. आता नाही म्हटले तरी प्रत्येकास ‘स्व त्व, ‘सत्व' जाणवू लागलेय. त्यामुळे माणसाचे परावलंबन कमी होऊ लागलेय. जगण्याच्या भाबडेपणाची जागा व्यवहार घेत आहे. त्यामुळे संध्याछायेत आपण लुटतो, फसवलो, लुबाडलो गेलो असे वाटण्याची उदाहरणे कमी होऊ लागलीत. घरे केवळ राहण्याच्या खोल्या न होता ते परस्पर प्रेम करायचं ठिकाण बनले पाहिजे, याची जाणीव मूळ धरू लागली आहे. 'वृद्धाश्रमात जाऊन स्क्रैप होऊन पडून राहण्यापेक्षा आपले घरच परस्परांचे ‘आधारश्रम कसे बनतील याचा विचार मूळ धरू पहातो आहे. नव्या स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे घरोघरी स्वेच्छानिवृत्तधारक अॅसेटस् होत आहेत. कधीकाळी वृद्ध म्हणजे जोखीम, जबाबदारी, ओझे वाटायचं. आता स्वेच्छानिवृत्तीचा सुवर्णहस्त (Golden Shake hand) घरोघरी नव्या वैभवाची आंदोलने निर्माण करतो आहे.

 जीवनाची इतिकर्तव्यता समजून संध्याछाया काळात लोक पूर्वी आध्यात्मिक व्हायचे. शिक्षण नसायचे, वाचायची सवय, आवड नसायची, छंद नसायचे. त्या काळात वाती वळत प्रवचन ऐकणे, टाळ कुटणे, भजन करणे, चारधाम, अष्टविनायक यात्रा करणे हीच संध्याछायेची साधने होती. आज शिक्षण, वाचन, छंद, प्रवास, सामाजिक सहभाग इ. वृत्तीमुळे संध्याछायेचा काल पूर्वीइतका खायला उठत नाही. जी माणसे संध्याछायेस 'राहून गेलेले भोगायचं म्हणत कला, क्रीडा, संगीत, साहित्य इ. चा आस्वाद घेत राहतात, त्यांना संध्याछाया वरदान ठरताना मी पहातो. संध्याछायेचा काळ आज ‘आत्मशोधाचे पर्व' झाले आहे. लोक या काळात स्वस्थपणे आपल्या पूर्व जीवनाचा आढावा घेतात. भविष्याच्या नियोजनाबद्दल ते पूर्वजांपेक्षा अधिक चिकित्सक, चोखंदळ असतात. माझे एका शिक्षक दांपत्यास मी पाहतो अन् लक्षात येते की अरे, वृद्धत्व वरदान आहे. दीर्घायुषी जीवनाची कुंजी ही आपल्या मनोधारणेत असते, ‘मनात जागा असली की घरात जागा असते' या सूत्राचा शोध ज्यांना लागला ती मंडळी सदैव तरुण राहतात. माझ्या परिचयाचे वृद्ध पिता-पुत्र संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक संघात एकमेकांची छान टोपी उडवताना मी पाहतो, तेव्हा लक्षात येते की संध्याछाया आता आनंदपर्वणी होते आहे.

आकाश संवाद/२३