पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्कार संजीवनीचे वरदान

 माणूस घडतो कसा? याचा मी शोध घेतो आहे. ते समजणं मोठं कठीण आहे, याची आता मला खात्री झाली आहे. माणसाच्या घडणीत संस्कारांचा वाटा सिंहाचा असतो खरा! पण या संस्कार संजीवनीचे स्वरूप गुंतागुंतीचं असतं अशी माझी धारणा झाली आहे. तुम्हाला सांगू का? एखादा माणूस असं म्हणू लागला की, “संस्कार बालपणात दिले गेले पाहिजे' “उमलत्या वयात संस्काराचे असाधारण महत्त्व असते." मला त्याचे हसू येते. लक्षात येतं की संस्काराचे खरे रूप त्यास कळलेलेच नाही.
 माझ्या मते, संस्कार ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. संस्कार बालपणात होतात तसे वानप्रस्थातही. पण हे मात्र खरे की संस्कार बालपणी झाले तर दीर्घजीवी तसेच दीर्घपरिणामी ठरतात. संस्कार म्हणजे मूल्यसंवर्धन. अपेक्षित वर्तन परिवर्तनार्थ केलेले प्रयत्न म्हणजे संस्कार. सभोवतालचं वातावरण, सभोवारच्या व्यक्ती, आपले विचार, आपलं वाचन, जीवनाचा अनुभव, निरीक्षण या सर्वांतून संस्कार आकार घेत असतात. प्रत्येक पूर्वपिढी ही उत्तरपिढी अधिक चांगली व्हावी म्हणून धडपडत असते.

 पूर्वी संस्कारांचा संबंध धर्म - कर्माशी होता. त्या काळी कर्मकांडांतून संस्कार होतात असा समज होता. प्राचीन काळी वयाच्या प्रत्येक पायरीचे धार्मिक संस्कार होते. पुढे त्यास कर्मकांडाचे रूप आले. कर्मामागील विचार, व्यवहार मागे पडला. कोणत्याही यांत्रिक पद्धतीच्या कार्यानी संस्कार होत नसतात, हे हळूहळू लोकांच्या लक्षात आलं. संस्कारास संजीवनी मानण्यात येतं ते त्याच्यातील सजीवपणामुळेच! संस्कार हा ठोकताळा नाही. प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आहे. प्रत्येक व्यक्तीची घडण, वृत्ती, स्वभाव लक्षात घेऊन संस्काराची बांधणी, रचना होणे महत्त्वाचे असते.

आकाश संवाद/१५