आपले आजचे जीवन मोठे धकाधकीचे झाले आहे. या गतीच्या जगात पालकांना आपल्या पाल्याकडे पाहण्यास वेळ उरलेला नाही. परिणामी या पिढीची मुले माध्यमांची ताबेदार झाली आहेत. अशा स्थितीत चांगल्या संस्कारांचे महत्त्व ठळक होते आहे. पालक धास्तावलेले आहेत नि मुले भांबावलेली आहेत. अशा काळात संस्कार संजीवनीचे वरदान समजून घेणे आवश्यकच नाही तर अनिवार्य होऊन बसले आहे.
माणसावर संस्कार जन्मभर होत असतात पण उमलत्या वयात झालेल्या संस्कारामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मोलाची मदत होत असते. बालपणी आपण जे वळण लावू ते जन्मभराचे बाळकडू बनते. साधारणपणे वयाची १२ ते २० वर्षे ही संस्काराची मानण्यात येतात. कुमार, किशोर व तरुण या अवस्था संस्काराच्या पेरणी व रुजवण्याच्या असतात. आई हे संस्काराचे सर्वाधिक संवेदनक्षम असे माध्यम आईचा प्रभाव माणूस जन्मभर वागवतो. आई संवेदना देते. बाबा दिशा दाखवतात. भाऊ-बहीण हे सहजीवनाचे सर्वाधिक जवळचे साथीदर होत. मोठे भाऊ-बहीण अनुकरणास उपयोगी, लहान भाऊ-बहिणींमुळे आपली समज विकसित होण्यास साहाय्य होते. घर हे सामाजिक संस्काराची प्राथमिक प्रयोगशाळा असते. इथले सारे शिकवणे, संस्करण अनौपचारिक असते आणि म्हणून ते अधिक प्रभावीही असते. जीवन कितीही गतिशील, यंत्रमय झाले तरी घरातील संस्कार संजीवनीचा उद्देश आपण जपायला हवा. घर संस्काराचा गाभारा असतो.
नंतर येते ती शाळा. तेथील शिक्षक हे प्रत्येक नव्या पिढीचे खरे शिल्पकार! माणसाला समज येत गेली की पालकांपेक्षा त्याच्यावरील शिक्षकाची मोहिनी परिणामकारक होत राहते. घरापेक्षा जगाची जाण देणारा, प्रत्येक नवी गोष्ट शिकवणारा शिक्षक माणसाचे डोळे उघडतो. माणसाला तो डोळे देतो. डोळस बनवणाच्या शिक्षकांना कोण बरे विसरू शकेल? मला तर माझ्या सर्व आयुष्यावर शिक्षकांची पडलेली विलक्षण मोहिनी आजही अमोल वाटते. ज्ञान, विज्ञान, वाचन, व्यवहार, आचार, उच्चार, अर्थ या सा-यांचा शिक्षक करत असलेला संस्कार असतो ना त्याला तोड नसते, म्हणून शिक्षक अविस्मरणीय असतात.
मग संस्कारात समाजाची भागीदारी सुरू होते. विशेषतः तारुण्यानंतरच्या काळात परिणामक्षम संस्कार घडविणारे केंद्र म्हणजे समाज! समाज हा एक असा संस्कार शिक्षक आहे की ती स्वत: कधीच काहीच शिकवत नाही. तुम्ही स्वतः त्याच्याकडून शिकायचे असतं. अनुभव, निरीक्षण, व्यवहार, शिष्टाचार