पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काळात मी माझे हस्ताक्षर सुधारले. त्या विद्यार्थ्याच्या वहीवर तो शेरा लिहिण्याच्या जाणीवेने मी जसे माझं हस्ताक्षर सुधारले. मी असं पाहतो की माझ्या जुन्या हस्ताक्षरांचे कोणते नमुने आहेत? तर माझ्याकडे असलेले सर्वांत जुने हस्ताक्षर आठवी इयत्तेतलं आहे. माझ्या प्रगतीपुस्तकातील मार्क उतरून काढलेला एक कागद माझ्या संग्रही आहे. तो माझा सर्वात जुना जतन केलेला कागद. सोळाव्या वर्षी मला जतन करायची जाणीव झाली. पण सोळा वर्षांपूर्वीचा इतिहास, नोंदी, पुरावे माझ्या संग्रही नाहीत. असे प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनाकडे पहायला लागला तर इतिहास जपला जाईल. अलीकडच्या काळात एक गोष्ट चांगली झाली की नवी सुशिक्षित पिढी आहे. ती आपल्या मुलांचे अंतर सारं जपू लागली आहे. म्हणजे आता शाळेतून प्रगती-पुस्तक, ग्रुप फोटो, त्याची ई कॉपी मिळते. त्यामुळे जतन सुरू झाले पण ते व्यक्तिगत पातळीवरच. सामाजिक पातळीवर जतनाचा संस्कार आपणाकडे नाही. त्यामुळे आपण कितीही गोष्टी गमावत, हरवत आहोत.

प्रश्न - सर, एकीकडे सामाजिक जाणीवेचा अभाव म्हणू या याला. घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात खूप मोठ्या संख्येनं माणसांची ये-जा होती. या गोष्टी कदाचित याला कारणीभूत असाव्यात. पण समाजाच्या दृष्टीने यामुळे मोठे नुकसान झाले असेल ना?

उत्तर - झाले म्हणजे झालेच. मी ज्या व्यक्तींची वस्तुसंग्रहालये उभारली त्या लोकांच्या साध्या साध्या गोष्टी माझ्या हाती आल्या नाहीत. नाशिकच्या मुक्त विद्यापीठात मी यशवंतराव चव्हाण साहेबांचे वस्तुसंग्रहालय उभे केले. मला त्यांचा मृत्यू दाखला नाही मिळू शकला. अशा गोष्टी जपायची साक्षरता आपण समाजात विकसित केली पाहिजे. हा खरे म्हणजे आपल्या लोकशिक्षणाचा आणि जे औपचारिक शिक्षण घेतो त्याचा अविभाज्य भाग आहे, असायलाही हवा. मला नेहमी असं दिसतं की कोणत्या देशांमध्ये असे जतन होते. मला आठवतो तो एक प्रसंग. मी फ्रान्स-जर्मनी महामार्गावरून प्रवास करत होतो. युरोपातील महामार्ग नाकासारखे सरळ असतात. मला एका ठिकाणी मात्र वळण दिसलं. या दोन देशांदरम्यानच्या हायवेवर. मी जिज्ञासेने पाहिलं की वळण कशासाठी होतं? तर माझ्या असं लक्षात आले की ह्या हायवेवर प्राचीन ग्रीक संस्कृतीतलं पाणी पुरवठा केंद्र होतं. विहिरीतले पाणी गुरुत्वाकर्षणानी त्या ठिकाणच्या शहराला पुरवलं जायचं. आपल्या कोल्हापूरला पण अशाच पद्धतीनी - सायफन, गुरुत्वाकर्षणानी कळंबा तलावाचे पाणी पुरवले जायचे. कमानी होत्या. त्यावरून पाटानी पाणी खजिन्यात यायचे.

आकाश संवाद/१०४